Home पुणे भाजप खासदार गिरीश बापट यांचे निधन

भाजप खासदार गिरीश बापट यांचे निधन

445
0

पुणे: भाजपचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचे बुधवारी सकाळी पुण्यात निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे. गिरीश बापट यांचे पार्थिव त्यांच्या शनिवार पेठेतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता वैंकुठ स्मशानभुमीत गिरीश बापट यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी प्रसारमाध्यमांना गिरीश बापट यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांनी म्हटले की, आज दुख:द घटना घडली आहे. भाजपचे लोकप्रिय खासदार गिरीश बापट आज आपल्यात राहिले नाहीत. त्यांचे काहीवेळापूर्वीच निधन झाले. गेले एक दीड वर्षे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, आज त्यांची प्राणज्योत मालवली. भाजपच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांसाठी हा धक्का असल्याचे जगदीश मुळीक यांनी सांगितले.
भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांची प्रकृती खालावल्याची माहिती आज सकाळी समोर आली होती. बापट यांच्यावर सध्या पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक असल्यामुले त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून भाजच्या गोटात हालचालींना वेग आला होता. गिरीश बापट यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर गर्दी केली आहे. गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते पुण्याकडे रवाना झाले आहेत.
गिरीश बापट हे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असून गेली अनेक वर्षे पुण्यातील राजकारणात त्यांचा दबदबा होता. मात्र,गेल्या काही वर्षांपासून गिरीश बापट यांना दुर्धर आजाराची लागण झाल्यामुळे ते राजकारणापासून दूर होते. त्यांचा मतदारसंघातील वावर जवळपास संपला होता. मात्र, नुकत्याच झालेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजप पक्ष अडचणीत सापडला असताना गिरीश बापट यांनी आजारपण बाजुला सारून कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला हजेरी लावली होती. या मेळाव्याला येतानाही गिरीश बापट यांच्या नाकात नळी आणि सोबत ऑक्सिजन सिलेंडर होता. या परिस्थितीमध्येही गिरीश बापट यांनी भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत त्यांच्यात चैतन्य फुंकण्याचा प्रयत्न केला होता. या मेळाव्यात गिरीश बापट यांना बोलताना प्रचंड धाप लागत होती. परंतु, इच्छाशक्तीच्या बळावर गिरीश बापट यांनी त्यांची कामगिरी पूर्ण केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here