Home संस्कृती गोरोबाकाकांच्या पुरातन वास्तूचा खांब निखळला

गोरोबाकाकांच्या पुरातन वास्तूचा खांब निखळला

469
0

वारकरी संप्रदायातील संतश्रेष्ठ गोरोबाकाकांच्या घराचा जीर्णोद्धार करून नव्याने हुबेहूब तसेच माळवदाचे घर उभारण्यासाठी राज्य पुरातत्त्व विभागाने एक कोटींचा निधी खर्च केला आहे. बांधकामाला चार वर्षे होण्याआधीच कामाचा दर्जा सर्वांसमोर येऊ लागला आहे.  रविवारी माळवदाचा एक खांब निसटून पडला आहे.

बाराव्या शतकातील तेर येथील संतश्रेष्ठ संत गोरोबाकाका यांचे घर पाहण्यासाठी पर्यटक, भाविक मोठय़ा प्रमाणात येतात. गोरोबाकाकांच्या घराची दूरवस्था झाली होती. त्यामुळे राज्य पुरातत्त्व विभागाच्या वतीने घराच्या बांधकामास सन २०१२-१३ मध्ये २५ लाख रुपये निधी खर्च करण्यात आला. भिंतीवरील मातीचा लावलेला लेपही ढासळत असल्याने तसेच पावसाळ्यात माळवदाला गळती लागत होती. त्यामुळे राज्य पुरातत्त्व विभागाच्या वतीने सन २०१५-१६ मध्ये पुन्हा ७७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्यानंतर घरांचे बांधकाम नव्याने करण्यात आले.

घराचे बांधकाम पूर्ण होऊन चार वर्षांंचा कालावधी पूर्ण होत नाही, तोपर्यंतच घराच्या माळवदास बसविण्यात आलेल्या  सागवानास वाळवी लागल्याने माळवदाचे सागवानी खांब कोसळण्यास सुरुवात झाली.   निकृष्ट कामाची चौकशी करून संबंधितांविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here