Home राजकीय कर्नाटक भाजपात चाललंय काय? दुसऱ्या यादीत माजी मुख्यमंत्र्यांसह सात आमदारांना डावललं!

कर्नाटक भाजपात चाललंय काय? दुसऱ्या यादीत माजी मुख्यमंत्र्यांसह सात आमदारांना डावललं!

468
0

आगामी कर्नाटक विधानसभा निवडणूक अवघ्या एका महिन्यांवर येऊन ठेपली आहे. विधानसभेच्या २२५ जागांसाठी येत्या १० मे रोजी मतदान होणार असून ही निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी कंबर कसली आहे. दरम्यान, मंगळवारी भाजपाकडून १८९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर बुधवारी लगेच २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली.

भाजपाने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीतही कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना स्थान मिळालेले नाही. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जगदीश शेट्टर यांच्याबरोबर सात विद्यमान आमदारांनीही डावलण्यात आलं आहे. त्यामुळे आता विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांनी दुसरी यादी जाहीर होण्याच्या एक दिवसापूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. तसेच हुबडी धारवाड या जागेवरून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती.

पहिल्या यादीत भाजपाने विद्यमान ११६ आमदारांपैकी नऊ आमदारांचे तिकीट कापले होते. तर २३ उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत सात विद्यमान आमदारांना तिकीट कापण्यात आलं आहे. भाजपाने दावणगेरे उत्तरमधील आमदार रवींद्रनाथ यांचे तिकिट कापून त्यांच्या जागी लोकीकेरे नागराज यांना उमेदवारी दिली आहे. बिंदूरचे विद्यमान आमदार सुकुमार शेट्टी यांचेही नाव या यादीत नाही. त्यांच्या ऐवजी गुरूराज गुंटूर यांना पक्षाने तिकिट दिले आहे. तर कोलार गोल्ड फील्ड (केजीएफ) मधून भाजप उमेदवार म्हणून अनुसूचित जातीचे उमेदवार अश्विनी संपांगी यांना तिकीट देण्यात आलं आहे.

दरम्यान, भाजपाने मंगळवारी १८९ जागांसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली होती. पहिल्या यादीत एकूण ५२ नवे चेहऱ्याना स्थान देण्यात आले होते. तर उर्वरित ९६ विद्यमान आमदार किंवा त्यांच्या नातेवाईकांना तिकीट देण्यात आले होते. यामध्ये २०१९ साली काँग्रेस आणि जेडएस पक्षांना सोडून आलेल्या १२ आमदारांचाही समावेश होता. भाजपाने आपल्या पहिल्या यादीत विद्यमान नऊ आमदारांचे तिकीट कापले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here