Home मनोरंजन ‘जानकी’ ही मालिका लोकांच्या नक्की पसंतीस पडेल.” सुभाष घई यांचं वक्तव्य

‘जानकी’ ही मालिका लोकांच्या नक्की पसंतीस पडेल.” सुभाष घई यांचं वक्तव्य

378
0

मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या दिग्दर्शकांपैकी एक असलेले दिग्दर्शक म्हणजे सुभाष घई. त्यांनी ‘परदेस’, ‘कर्मा’, ‘राम लखन’, ‘ताल, यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. सुभाष घई यांनी त्यांची कारकीर्द अभिनयापासून सुरू केली, पण नंतर त्यांनी आपला मोर्चा दिग्दर्शन आणि निर्मितीकडे वळवला. ८० आणि ९० च्या दशकात एकापाठोपाठ एक सुपरहीट चित्रपट देणारे सुभाष घई सध्या या क्षेत्रापासून बरेच लांब आहेत, त्यांनी दिग्दर्शनही थांबवलं आहे, पण त्यांचं लिखाण आणि निर्मिती क्षेत्रात काम सुरू आहे.

आता मोठ्या पडद्याप्रमाणेच छोट्या पडद्यावरच्या प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सुभाष घई सज्ज आहेत. ‘जानकी’ या मालिकेतून ते टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण करणार आहेत. सुभाष घई यांची निर्मिती संस्था मुक्ता आर्ट्स आणि दूरदर्शन एकत्र येऊन ही मालिका आपल्यासाठी घेऊन येत आहे. यावर्षी मे महिन्यात या मालिकेचे प्रसारण सुरू होणार आहे.

‘मिड डे’च्या रीपोर्टनुसार सुभाष घई म्हणाले, “कोविड काळात घरी बसून मी चित्रपट आणि टेलिव्हिजन या दोन्ही माध्यमांचं बारकाईने निरीक्षण केलं. टेलिव्हिजनसुद्धा ओटीटी सिरिज, टीव्ही सीरिज आणि मोबाईल सीरिज यामध्ये विभागला गेला आहे. प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून कसं ठेवायचं हे कोविड काळात मी टेलिव्हिजनमधून शिकलो. चित्रपट आणि टेलिव्हिजन या दोन्ही माध्यमातील मोठा फरक माझ्या ध्यानात आला.”

आगामी मालिकेविषयी बोलताना घई म्हणाले, “ही मालिका मे महिन्यात दुरुदर्शनवर प्रसारित केली जाणार आहे. याचे तब्बल २०८ भाग आहेत ज्याचं चित्रीकरण मार्चपासूनच सुरू होणार आहे. निर्माते राहुल पुरी आणि या मालिकेचे लेखक यांनी उत्कृष्ट काम केलं आहे. यामध्ये ७ गाणीसुद्धा आहेत. मला पूर्ण खात्री आहे की ‘जानकी’ ही मालिका लोकांच्या नक्की पसंतीस पडेल.” मध्यंतरी सुभाष घई यांनी ‘झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही ‘३६ फार्महाऊस’ नावाचा एक शोसुद्धा सादर केला होता ज्याला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here