Home मनोरंजन हृता दुर्गुळेने ‘दादा एक गुड न्यूज आहे’ नाटक का सोडलं याबद्दल स्पष्टच...

हृता दुर्गुळेने ‘दादा एक गुड न्यूज आहे’ नाटक का सोडलं याबद्दल स्पष्टच सांगितलं

219
0

मुंबई :’दुर्वा’, ‘फुलपाखरू’, ‘मन उडू उडू झालं’ अशा मालिकांमधून पुढे आलेला लोकप्रिय चेहरा म्हणजे हृता दुर्गुळे. मालिकांमध्ये चमकल्यानंतर हृतानं सिनेमा, नाटक आणि वेब सीरिजमध्येही नाव कमावलं. ‘दादा एक गुड न्यूज आहे’, ‘अनन्या’, ‘टाइमपास ३’, ‘स्ट्रॉबेरी शेक’ अशा वैविध्यपूर्ण कलाकृतींमध्ये हट के भूमिका साकारत तिनं प्रेक्षकांची वाहवा मिळवली. हृताचा चाहतावर्ग मोठा आहे. सोशल मीडियावरही तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. पण ती सोशल मीडियावर कशी वावरते, या माध्यमाविषयीची तिची मतं, विचार याबद्दल तिनं विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. ‘सगळ्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. इतरांचा विचार करत बसलो तर आयुष्यात पुढे जाता येणार नाही’ असं परखड मत यावेळी तिनं मांडलं.अभिनेत्री अलीकडेच ‘टाइमपास ३’ या सिनेमात दिसली होती. या सिनेमाबाबत बोलताना हृता म्हणाली की, ‘टाइमपास ३ चा सिक्वेन्स, गाणी जोशी-बेडेकर कॉलेजच्या कॅम्पस, लायब्ररी, पायऱ्यांजवळ चित्रित झाली असल्यानं पुन्हा इथे आल्यावर त्या दिवसांची आठवण आली. रुईयामधून शिक्षण घेत असताना माझी ‘दुर्वा’ ही मालिका सुरू होती. त्यामुळे माझा कॉलेजपेक्षा सेटवरच जास्त वेळ जायचा. त्यानंतर ‘फुलपाखरू’ मालिकेमुळे मला कॉलेजविश्व पुन्हा अनुभवायला मिळालं. कॉलेजची ही वर्षं अनमोल असतात. तो अनुभव परत कधीच घेता येत नाही आणि असे मित्र पुन्हा जोडले जात नाहीत.’


अभिनेत्री पुढे म्हणाली की, ‘दुर्वा मालिकेच्या वेळी सोशल मीडिया इतकं विस्तारलं नव्हतं. ‘फुलपाखरू’ ही मालिका माझ्यासाठी टर्निंग पॉइंट ठरली. त्यातल्या वैदेही या पात्राला सोशल मीडियावर भरपूर प्रेम मिळालं. माझ्या कामाचं प्रचंड कौतुक झालं असलं तरी एक सांगते, सोशल मीडियामुळे फॉलोअर्स मिळतात; पण काम मिळवण्यासाठी चांगला अभिनयच करावा लागतो. हा रिअॅलिटी चेक मला वेळेतच मिळाला; त्यामुळे मी वाहवत गेले नाही. फॉलोअर्स खूप असले तरी ते तिकीट काढून कलाकृती बघायला येणाऱ्यांची संख्या कमी आहे. हे चित्र बदलायला हवं.’इन्स्टाग्रामवर मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेत्रींमध्ये सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या हृताची सोशल मीडियाबाबत वेगळी मतं आहेत. याविषयी ती म्हणाली की, ‘सोशल मीडियाकडे मी कामाचा भाग म्हणूनच बघते. कलाकार भूमिकांमधून वेगवेगळी आयुष्य जगत असतो. अशा वेळी सोशल मीडियावर अजून एक वेगळी इमेज निर्माण करण्यापेक्षा खऱ्या आयुष्यातील हृता म्हणून जगणं हे जास्त महत्त्वाचं असतं. सोशल मीडियाचा विशिष्ट मार्गानं वापर करत तिथून अर्थार्जन करणं हा व्यवसायाचा एक भाग आहे.

करोनाकाळात अनेकांनी सोशल मीडियाचा अशा प्रकारे वापर केला आहे. त्यासाठी मेहनतही खूप केली. पण या सगळ्यात थोडासा डिटॉक्सही चालेल. इन्स्टाग्रामवर दिसतं ते सगळंच खरं नसतं. प्रत्येक गोष्टीवर बोललंच पाहिजे असंही नाही. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो हे आपण लहानपणापासून ऐकतो. तीच गोष्ट सोशल मीडियाचीही आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा हुशारीनं वापर करणं गरजेचं आहे.’यशाच्या शिखरावर असल्याने हृताला अनेकदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. याविषयी बोलताना अभिनेत्री म्हणाली की, ‘सगळ्यांच्याच बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नसते. आपल्या निर्णयांमुळे समोरच्याला काय वाटेल याचा विचार करत बसलो तर आयुष्यात कधीच पुढे जाता येणार नाही.

प्रतीकशी लग्न ठरल्यावर त्याच्या मराठी-अमराठी असण्यावरून अनेक जणांनी मला प्रश्न विचारले; पण शब्दाला शब्द लागून वाद वाढवण्यापेक्षा अशा बोलण्याकडे दुर्लक्ष करणं मी पसंत केलं.’अभिनेत्रीने या कार्यक्रमात आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्यासोबत भविष्यात काम करण्याची इच्छा व्यक्त केली. याशिवाय पुढे काय योजना आहे याबद्दल बोलताना ती म्हणाली की,

‘मी त्या-त्या वर्षात काय काम करायचं याचं नियोजन करते. करोनामुळे आपल्याला कळून चुकलंय की नियोजन केलं तरी कधी काय होईल याची कोणालाही कल्पना नसते. यंदा मी पहिल्यांदाच कोणत्याही प्रकारचं नियोजन केलेलं नाही. प्रत्येक दिवस येईल तसा जगायचा असं मी ठरवलं आहे.’अभिनेत्रीचं ‘दादा, एक गुड न्यूज आहे’ हे नाटक विशेष गाजलं. टेलिव्हिजनच्या या नायिकेचा रंगभुमीवरील वावर प्रेक्षकांनी यानिमित्ताने पाहिला. याबाबत बोलताना अभिनेत्री म्हणाली की, ‘या नाटकातून बाहेर पडणं हा माझ्यासाठी खूप कठीण निर्णय होता. त्यावेळी एकाच वेळी खूप कामं सुरू होती. पुरेसा वेळ देता येत नाही म्हणून नाटकाच्या टीमवर मला अन्याय होऊ द्यायचा नव्हता. पुन्हा रंगभूमीवर यायला आवडेल; पण अशी चांगली भट्टी जमून यायला हवी.’

तर ‘अनन्या’विषयी अभिनेत्री म्हणाली की, ‘अनन्या ही कलाकृती माझ्यासाठी खास होती. काहीही झालं तरी हार न मानण्याची अनन्याची वृत्ती मला भावली. या भूमिकेमागे बरीच मेहनत होती. सिनेमाच्या चित्रीकरणानंतर रिकव्हर व्हायला मला काही वेळ द्यावा लागला.’मी रुईया कॉलेजची विद्यार्थिनी आहे. काही वर्षांपूर्वी ‘मुंटा कार्निव्हल’च्या सेलिब्रिटी गेम इव्हेंटसाठी मी गेले होते. त्यावेळी मी विकेट घेऊन माझ्या टीमला जिंकवलं होतं. त्यामुळे रुईया आणि ‘मुंटा कार्निव्हल’ हे दोन्ही माझ्यासाठी खास आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here