Home राजकीय “दही हंडी मंडळ ते शेतकऱ्यांपर्यंत सर्वांना फक्त आश्वासनं”, आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

“दही हंडी मंडळ ते शेतकऱ्यांपर्यंत सर्वांना फक्त आश्वासनं”, आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

239
0

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कॅबिनेटमधील अनेक मंत्री, बंडखोर आमदार, खासदार यांच्यासह नुकतेच अयोध्या दौऱ्यावर गेले होते. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे काही नेतेदेखील उपस्थित होते. परंतु एकीकडे राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी पंचनामे आणि मदतीच्या प्रतीक्षेत असताना राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या कॅबिनेटमधील मंत्री दौऱ्यावर असल्याने विरोधकांकडून टीका सुरू आहे. अशातच या टीकेला प्रत्युत्तर म्हणून मुख्यमंत्री अयोध्या दौऱ्यावरून परतल्यानंतर अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी नाशिकच्या सटाणा तालुक्यात दाखल झाले.

मुख्यमंत्र्यांनी सटाणा येथील अवकाळीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाची पाहणी केली. मुख्यमंत्री शिंदे यांच्या या पाहणी दौऱ्यावर शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. आदित्य ठाकरे महणाले की, शेतकरी अडचणीत असताना मुख्यमंत्री कुठे गेले होते ते सर्वांना माहितीच आहे. तिथून आल्यावर ते केवळ फोटो काढण्यासाठी शेतकऱ्याच्या बांधावर गेले होते.

आदित्य ठाकरे म्हणाले की, या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचे अनेक दौरे होत असतात. परवा राज्यात काही ठिकाणी गारपीट झाली, तेव्हा मुख्यमंत्री कुठे होते हे सर्वांना माहितीच आहे. त्यांनी कुठेही शेतकऱ्यांना भेटी दिल्या नाहीत. परंतु एका ठिकणी फोटोसाठी कुठेतरी बांधावर गेले होते. अद्याप कुठेही शेतकऱ्याला मिळाली नाही. त्यांना केवळ आश्वासनं मिळतात. दही हंडी मंडळांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत सर्वांना केवळ आश्वासनं मिळतात. रोजगाराची आश्वासनं मिळतात पण त्यावर कुठेही कसलीही कार्यवाही होत नाही. वेदांता फॉक्सकॉन प्रकरणापासून नोकऱ्यांचीसुद्धा नुसती आश्वासनं दिली जातात. परंतु एकही आश्वासन अद्याप पूर्ण झालेलं नाही. मी आधीही सांगितलं आहे, आत्ताही सांगेन की, हे घटनाबाह्य सरकार अल्प आयूचं आहे आणि ते लवकरच कोसळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here