Home आरोग्य माऊस आणि किबोर्ड वापरण्याच्या पद्धतीवरून समजते तुम्ही तणावग्रस्त आहात की नाही?

माऊस आणि किबोर्ड वापरण्याच्या पद्धतीवरून समजते तुम्ही तणावग्रस्त आहात की नाही?

453
0

कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणारे बहुतांश जण हल्ली तणावाखाली काम करत आहेत. कामाचे टार्गेट, परफॉर्मन्स अशा विविध कारणांमुळे कर्मचाऱ्यांना तणावाचा सामना करावा लागत आहे. या तणावाचा आपल्या वागण्यावर आणि काम करण्याच्या पद्धतीवरही अनेक प्रकारे प्रभाव पडत आहे. एखादी व्यक्ती किती तणावाखाली आहे याची कल्पना काही अनुभवी तज्ज्ञांना त्यांच्याकडे पाहिल्यावर लगलेच येते. याशिवाय ह्रदयाची गती, रक्तदाब यांसारख्या घटकांच्या मदतीनेही आपल्याला तणावाचे कारण शोधता येते. मात्र स्विसच्या शास्त्रज्ञांनी एका नव्या अभ्यासाच्या आधारे असा दावा केला आहे की, कॉम्प्युटरचा माऊस आणि कीबोर्डवर काम करणाऱ्या व्यक्तीचे वर्तन समजून घेऊन तणावाचे मूल्यांकन केले जाऊ शकते.

संशोधकांनी असा दावा केला आहे की, कॉम्प्युटरचा माऊस हा व्यक्तीच्या हृदयाच्या ठोक्यापेक्षा चांगला ताण निर्देशक ठरू शकतो. झुरिचमधील स्विस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (ETHZ) मधील संशोधकांनी म्हटले की, त्यांनी एक नवीन डेटा आणि मशीन लर्निंग वापरून एक नवे मॉडेल विकसित केले आहे.यात संशोधकांनी अभ्यासासाठी ९० लोकांची निवड केली होती, यानंतर सहभागी लोकांना लॅबमध्ये नियोजन, भेटींचे वेळापत्रक, डेटा रेकॉर्डिंग किंवा विश्‍लेषण इत्यादी गोष्टी देण्यात आल्या.

या अभ्यासात काही सहभागी लोकांना काम करण्यासाठी एकटे सोडण्यात आले होते आणि इतरांना वारंवार चॅट आणि मेसेजच्या माध्यमातून नोकरीसाठी एका इंटव्ह्यूमध्ये सहभागी होणार आहे का? असे विचारून त्रास देण्यात आला. यावेळी तणावग्रस्त लोक कोण आहेत आणि तणाव नसलेल्या लोकांच्या तुलनेत हे लोक कॉम्प्युटरचा माउस आणि कीबोर्ड कसा वापरतात हे संशोधकांनी शोधून काढले.

अभ्यासात असे आढळून आले की, तणावाखाली असलेल्या लोकांनी कॉम्प्युटरचा माऊस पॉइंटर अधिक वेळा आणि कमी अचूकतेने हलवला. यासोबतच त्यांनी स्क्रीनवर अधिक वेळ घालवला, हे लोक टायपिंग करताना चुका करायचे आणि टायपिंग करताना अनेक वेळा थांबायचे.तणावाखाली नसलेले लोक देखील टायपिंग करताना मधे-मधे थांबत होते. परंतु खूप कमी वेळा आणि दीर्घ कालावधीसाठी ते असे करत होते. संशोधकांनी सांगितले की, न्यूरोमोटर नॉईज थिअरीद्वारे, ताण आणि कीबोर्ड- माऊस वापरण्याचे वर्तन यांच्यातील संबंध स्पष्ट केले जाऊ शकतो.

अहवालानुसार, स्वित्झर्लंडमधील तीनपैकी एक व्यक्ती कामाच्या ठिकाणी तणावाचा सामना करत आहे. विशेष म्हणजे कामाच्या ठिकाणी तणावाची समस्या केवळ स्वित्झर्लंडसाठीच नाही, तर भारतासह संपूर्ण जगासाठी हे आव्हान आहे. यामुळे काही कंपन्यांनीही या गोष्टीचा गांभीर्याने विचार करण्यास सुरुवात केली ही एक चांगली गोष्ट आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here