Home अर्थकारण मोठी बातमी… तुमच्या गृहकर्जाचा EMI वाढणार नाही, RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांची...

मोठी बातमी… तुमच्या गृहकर्जाचा EMI वाढणार नाही, RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांची घोषणा

281
0

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेची (आरबीआय) चलनविषयक धोरण समितीची तीन दिवसीय बैठक आज संपली. बैठक संपल्यानंतर सकाळी १० वाजता गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती दिली. मे २०२२ पासून रेपो दरात वाढ केल्यानंतर सर्वसामान्यांना यंदा मोठा दिलासा देत रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. आरबीआयने सांगितले की, रेपो दर एकमताने कायम ठेवण्यात आला आहे. म्हणजेच रेपो दर ६.५% वर अबाधित आहे. म्हणजे आता तुमच्या कर्जावरील EMI वाढणार नाही. सरकारने ८ फेब्रुवारी २०२३ रोजी आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी रेपो दरात शेवटची वाढ केली होती.

मागील वर्षी मे २०२२ पासून आरबीआयने सातत्याने मुख्य व्याजदरात वाढ केली. वाढत्या महागाईला नियंत्रणात आणण्यासाठी ही दरवाढ करण्यात आली असली तरी किरकोळ महागाईचा दर या काळात रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेल्या ६% दरापेक्षा अधिक राहिला आहे. लक्षात घ्या की पतधोरण निश्चित करताना समितीसमोर प्रामुख्याने किरकोळ महागाई दर आणि विकसित देशांच्या मध्यवर्ती बँकांनी घेतलेले निर्णय या दोन्ही बाबी असतात. अलीकडेच अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह, युरोपीय मध्यवर्ती बँक आणि बँक ऑफ इंग्लंड यांनी देखील व्याजदरात वाढ केली होती. अशा स्थितीत भारतीय रिझर्व्ह बँक देखील रेपो दरवाढ करेल हे अपेक्षित मानले जात होते.

केंद्रीय बँकेच्या या निर्णयामुळे महागड्या गृहकर्जाचा फटका बसलेल्या लोकांना दिलासा मिळाला आहे. रेपो दर न वाढवल्यानंतर आता बँका कर्जाच्या व्याजदरात वाढ करणार नाहीत, म्हणजे आता तुमच्यावर कर्जाचा बोजा वाढणार नाही आणि वाढीव EMI पासून काही काळासाठी दिलासा मिळाला आहे. लक्षात घ्या की रेपो दर वाढल्यामुळे बँकांना आरबीआयला पूर्वीपेक्षा जास्त व्याज द्यावे लागतं. बँक जास्त व्याज आकारणार असेल तर ते तुमच्याकडूनच आकारणार हे स्पष्ट आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दर वाढवल्यापासून बँकांनी देखील गृह, वाहन कर्जासह सर्व वैयक्तिक कर्जे महाग केली. यामुळे तुमचे EMI वाढते. मात्र, यावेळी आरबीआयने लोकांना दिलासा देत रेपो दर जुन्या दरावरच कायम ठेवला आहे.

किरकोळ महागाईचा दर फेब्रुवारीमध्ये वार्षिक आधारावर ६.४४% वाढला, मात्र जानेवारीच्या ६.५२ टक्क्यांपेक्षा कमी आहे. लक्षात घ्या की गेल्या काही काळापासून चलनवाढ मध्यवर्ती बँकेच्या २% ते 6 टक्क्यांच्या मर्यादा पातळी श्रेणीपेक्षा जास्त राहिला आहे. केंद्रीय बँकेने गेल्या ८ पतधोरण बैठकींपैकी ६ वेळा रेपो दरात वाढ केली असून गेल्या वर्षी मे महिन्यापासून दरवाढीचे सत्र सुरु झाले, ज्याला आज ब्रेक लागला आहे. तेव्हा आरबीआयचा रेपो रेट ४% होता, जो आता ६.५ टक्क्यांवर पोहोचला आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणतात की, जागतिक स्तरावरील वाढत्या संकटाला लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here