Home मनोरंजन हिंदीतही रिलीज होणार भाऊसाहेब शिंदेचा ‘रौंदळ चित्रपट ‘; प्रेक्षकांच्या तूफान प्रतिसादानंतर

हिंदीतही रिलीज होणार भाऊसाहेब शिंदेचा ‘रौंदळ चित्रपट ‘; प्रेक्षकांच्या तूफान प्रतिसादानंतर

431
0

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला ‘रौंदळ’ हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट अखेर रसिकांच्या भेटीला आला आहे.लक्षवेधी टीझर आणि ट्रेलरसोबतच या चित्रपटातील गाण्यांनी ‘रौंदळ’ रिलीजपूर्वीच सर्वांच्या मनात चित्रपटाबद्दल कुतूहल निर्माण केलं होतं. त्यामुळे प्रेक्षकांनी फर्स्ट डे फर्स्ट शोपासूनच ‘रौंदळ’ पाहण्यासाठी गर्दी केली. शुक्रवारी चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच झालेलं अॅडव्हान्स बुकिंग आणि नंतर झालेल्या करंट बुकिंगच्या बळावर या चित्रपटानं पहिल्या वीकेंडला चांगली कमाई केली आहे. शहरी तसेच ग्रामीण भागातील प्रेक्षकांना ‘रौंदळ’ चित्रपट आवडला आहे. आता लवकरच हा चित्रपट हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाच्या कलेक्शनबाबत…

प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसाद मिळवलेल्या रौंदळ या चित्रपटानं शुक्रवार, शनिवार आणि रविवारी या चित्रपटानं 5 कोटी रुपयांहून अधिक कमाई केला आहे. एकूण 320 सिनेमागृहामध्ये रिलीज झालेला ‘रौंदळ’ 890 शोजसह प्रचंड गर्दीत सुरू आहे. बॉक्स ऑफिसवरील या सकारात्मक चित्रानंतर लवकरच ‘रौंदळ’ हिंदी भाषेतही प्रदर्शित करण्यात येणार असल्याचं निर्मात्यांनी घोषित केलं आहे. चित्रपटाचं कथानक रसिकांना आपलसं करत असून, कलाकारांचा अभिनय मनाला भावत आहे. प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रियांमुळे इतर प्रेक्षकांची पावलंही ‘रौंदळ’ पाहण्यासाठी सिनेमागृहाच्या दिशेनं वळत आहेत.

‘रौंदळ’मधील गाणी खऱ्या अर्थानं मराठी संगीतरसिकांसोबतच अमराठी संगीतप्रेमींच्या मनातही रुंजी घालू लागली आहेत. संगीतकार हर्षित अभिराज यांचे संगीत लाभलेल्या ‘मन बहरलं…’, ‘ढगानं आभाळ…’ या गाण्यासोबतच ‘भलरी…’ हे शेतीवरील गाणं महाराष्ट्रातील तमाम संगीतप्रेमींनी अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे. बिकट परिस्थितीतही भक्कमपणे पाय रोवून उभे रहात अन्यायाविरुद्ध लढण्याचं बळ देणारा हा प्रेरणादायी चित्रपट असल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. नव्या कोऱ्या जोडीची केमिस्ट्री आणि त्यांची लव्हस्टोरी रसिकांचं मन मोहित करत आहे.

जबरदस्त अॅक्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती बाळासाहेब शिंदे, डॉ. पुरुषोत्तम भापकर, प्रमोद चौधरी, भाऊ शिंदे आणि राईज बिझनेस ग्रुप यांनी केली आहे. रवींद्र औटी, संतोष औटी, कैलाश गुंजाळ आणि संजय कुंजीर या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. या संगीतप्रधान संघर्षमय लव्हस्टोरी असणाऱ्या ‘रौंदळ’ या चित्रपटाचं दिग्दर्शन गजानन नाना पडोळ यांनी केलं आहे. भाऊसाहेब शिंदेच्या दमदार एंट्रीला टाळ्या-शिट्टयांचा वर्षाव होत आहे. भाऊसाहेब शिंदे आणि नेहा सोनावणे या नव्या कोऱ्या जोडीनं प्रेक्षकांच्या मनावर गारूड केलं आहे. संजय लाकडे, यशराज डिंबाळे, सुरेखा डिंबाळे, शिवराज वाळवेकर, गणेश देशमुख, सागर लोखंडे या कलाकारांनी ‘रौंदळ’मध्ये अभिनय केला आहे. वास्तवदर्शी वाटणारी अॅक्शन दृश्ये लक्ष वेधून घेत आहेत. या सिनेमाचे असोसिएट दिग्दर्शक विक्रमसेन चव्हाण आहेत, तर कार्यकारी निर्माते मंगेश भिमराज जोंधळे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here