Home क्राइम स्वतःला लष्करी अधिकारी सांगून केले ५ जणींशी लग्न

स्वतःला लष्करी अधिकारी सांगून केले ५ जणींशी लग्न

992
0

बेळगाव : लष्करात सुभेदार मेजर असल्याचे सांगून मंजुनाथ बिरादार या तोतया लष्करी अधिकाऱ्याने पाच जणींशी विवाह केला आणि दहा पेक्षा अधिक शहीद जवानांच्या पत्नींना ‘वन रँक, वन पेन्शन’ देतो म्हणून पैसे उकळले. तसेच अनेक जणांना सैन्यात नोकरी लावतो म्हणून हजारो रुपये घेतल्याचे पोलीस चौकशीत त्याने कबूल केले आहे.

कॅम्प विभागात लष्करी गणवेश परिधान करून संशयास्पदरित्या वावरत असलेल्या व्यक्तीला पकडून लष्कराने कॅम्प पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केल्यावर त्याचे बिंग फुटले. तोतया लष्करी अधिकाऱ्याचे नाव मंजुनाथ बिरादार असे असून तो विजापूर जिल्ह्यातील नालवतवाड गावातील आहे.

एखाद्या गावात लष्करी गणवेशात जायचे आणि नंतर गावातील प्रमुख मंडळींची भेट घेऊन त्यांच्यावर छाप पाडायची. त्यानंतर मी अनाथ आहे असे सांगून मला लग्न करायचे आहे असे सांगायचे. नंतर गावातील मुलीशी लग्न करून महिनाभर सासुरवाडीत पाहुणचार झोडून तो अचानक एक दिवस गायब होत असे. तसेच गावातील शहीद कुटुंबाचा जाहीर सत्कार करून त्यांच्याशी ओळख वाढवून वन रँक वन पेन्शन मिळवून देतो असे सांगून दहा शहीद जवानांच्या पत्नींकडून त्याने पैसे उकळले आहेत. याशिवाय सैन्यात नोकरी लावतो म्हणून देखील पैसे घेऊन अनेकांची फसवणूक केली आहे.सध्या कॅम्प पोलीस कसून मंजुनाथची चौकशी करत आहेत. लष्करी गणवेशात कॅम्प विभागात फिरत असताना सापडल्याने कॅम्प पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here