Home औरंगाबाद वाळू माफियांच्या युद्धाचा भडका

वाळू माफियांच्या युद्धाचा भडका

503
0

युनूस उर्फ ‘लादेन’ला दिली सुपारी अन् औरंगाबादेत चालली गोळी
मराठवाडा साथी न्यूज

औरंगाबाद : मुंगीच्या (ता. शेवगाव, जि. अहमदनगर) वाळू माफियाच्या पुतण्यावर गुरूवारी (ता. २९) रात्री औरंगाबाद शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात गोळी चालविली. शेख अहमद आणि युनूस उर्फ ‘लादेन’ या दोन वाळू माफियांच्या टोळीतून हा गोळीबार झाल्याचा पोलिसांना संशय आहे. दरम्यान पैठण आणि परिसरातील वाळू तस्करी बंद असल्याने हे वाळू माफियांचे युद्ध भडकले असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्ह्याची नोंद केली आहे. हा हल्ला खरच झाला किंवा नाही, याची पोलिसांना शंका होती. पण हल्ला झाल्याची खात्री पटली असून या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केल्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी सांगितले. अटक केलेल्यांमध्ये शेख बाबर शेख शेरू (वय-२८,रा. हमीदिया गार्डन, बीड बायपास) आणि शेख अल्ताफ शेख अन्वर (वय-१९, रा. सादतनगर) यांचा समावेश आहे. तर एक जण फरारी होण्यात यशस्वी झाला आहे.

काय घडली घटना?
इमरान शेख अहमद शेख (२५, रा. मुंगी) असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. जखमी इमरान हा कुख्यात वाळूमाफिया शेख युनूस उर्फ ‘लादेन’चा पुतण्या आहे. तो गुरुवारी रेल्वे स्टेशन परिसरातील जालाननगरात राहणाऱ्या अदनान नावाच्या मित्राकडे आला होता. रात्री साडे सात वाजेच्या सुमारास तो अर्बन ग्रोसरी या दुकानासमोर उभा होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या अनोळखी व्यक्तीने त्याच्यावर पिस्तुलातून गोळी झाडली. ही गोळी इमरानच्या कमरेला चाटून गेल्याने तो सुदैवाने बचावला.
जखमी अवस्थेत इमरानने वेदांतनगर पोलीस ठाणे गाठले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, पोलीस निरीक्षक मयेकर, पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे आणि अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. हा हल्ला खरोखरच झाला की हल्ल्याचा बनाव केला आहे, याची खात्री करून तपासाची चक्रे फिरली. दरम्यान, सातारा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली.

लादेनची वाळूपट्ट्यात दहशत
युनूस उर्फ लादेनवर अनेक गुन्हे आहेत. त्याच्याकडे रिव्हॉल्व्हर असल्याची पोलिसांना माहिती आहे. यापूर्वी त्याने पैठण येथे कार्यरत असणारे पोलीस निरीक्षक गिते यांना रिव्हाॅल्व्हरचा धाक दाखविला होता. तहसिलदारांसह अनेक शासकीय कर्मचाऱ्यांना धमकावल्याचा युनूसवर आरोप आहे. तसे गुन्हेही त्याच्याविरूद्ध अगदी गेवराई (जि. बीड) पासून ते पैठण (जि. औरंगाबाद) सह शेवगाव (जि. अहमदनगर) येथेही नोंद झालेली आहेत. या संपूर्ण गोदावरीच्या पट्ट्यात युनूस उर्फ लादेनची दहशत आहे.

सुपारी दिल्याचा संशय
सूत्रांनी सांगितले की, इमरानचे वडील आणि शेख युनूस उर्फ लादेन यांच्यात वाळू पट्ट्यावरून भांडण सुरू आहे. यातून युनूस उर्फ लादेनने सुपारी देऊन इमरानवर गोळी झाडल्याचा, संशय पोलिसांनी व्यक्त केला. मुंगी येथील प्रार्थनास्थळाविषयी इमरानच्या नातेवाईकांचा वाद सुरू आहे. यातून हा हल्ला झाला असावा, असा अंदाजही अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here