Home ठाणे मनसेचा आज 17 वा वर्धापन दिन:राज ठाकरे यांची सायंकाळी ठाण्यात सभा

मनसेचा आज 17 वा वर्धापन दिन:राज ठाकरे यांची सायंकाळी ठाण्यात सभा

249
0

भगवा झंझावात म्हणत नेत्यांनी टिझर केला ट्विट

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 17 वा वर्धापन दिन आहे. यानिमित्त मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ठाण्यात सायंकाळी सभा होत आहे. या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.दरम्यान, वर्धापन दिनानिमित्त मनसेकडून ‘भगवा झंझावात’, ‘नव्या दमाने, नव्या आयुधांसह… नवनिर्माण सज्ज!’, अशा आशयाचे पोस्टर प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील राजकीय वाटचालीसाठी राज ठाकरे कार्यकर्त्यांना कोणती दिशा दाखवणार? नेमका काय आदेश देणार?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर९ मार्च २००६ रोजी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती. गेल्या १७ वर्षांच्या राजकीय वाटचालीत मनसेने चांगलेच चढउतार पाहिले. पहिल्याच विधानसभा निवडणुकीत १३ आमदार निवडून आलेल्या मनसेचा सध्या एक आमदार आहे. त्यामुळे मनसेला पुन्हा उभारी देण्याचा राज ठाकरे यांचा प्रयत्न असणार आहे. या निमित्त गडकरी रंगायतन येथे सायंकाळी ६ वाजता राज ठाकरेंची सभा होणार आहे.राज ठाकरेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर ‘साहेब’ असे फलक लावून मनसेने ठाण्यात वातावरणनिर्मिती केली आहे. सभेच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी मनसेने केली आहे. गेल्या काही महिन्यात राज ठाकरेंनी राज्यातील अनेक ठिकाणी दौरे केले होते. तसेच पदाधिकाऱ्यांच्या बैठकाही घेतल्या होत्या. त्यानंतर आज संघटनेच्या वाटचालीसंदर्भात राज ठाकरे नेमकी कोणती भूमिका मांडतात, याकडे लक्ष असणार आहे.


मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज ठाकरे यांच्या सभेचा टीझर ट्विट केला आहे. त्यात ‘भगवा झंझावात’, ‘विचार महाराष्ट्र धर्माचा, निर्धार हिंदवी स्वराज्याचा’, अशा आशयाचे पोस्टर आहेत. काही दिवसापूर्वी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर काही जणांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. यासंदर्भात देखील राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here