Home अर्थकारण एसटीत महिलांचा ‘आवाज’! एकाच दिवसात 11 लाख जणींनी केला प्रवास, महामंडळाची 6...

एसटीत महिलांचा ‘आवाज’! एकाच दिवसात 11 लाख जणींनी केला प्रवास, महामंडळाची 6 कोटी रुपयांची कमाई

261
0

सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असलेल्या एसटीत आता महिलांचा आवाज आहे. राज्य सरकारने महिलांसाठी 50 टक्के सवलतीच्या प्रवासाची घोषणा केल्यानंतर शनिवारी एका दिवसात तब्बल 11 लाख 30 हजार 283 महिलांनी एसटीने प्रवास केला आहे.त्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणारे एसटी महामंडळही मालामाल झाले असून तब्बल महिला प्रवाशांच्या तिकिटातून एकूण 5 कोटी 68 लाख रुपयांची कमाई झाली आहे.

कोरोना महामारीमुळे एसटीची प्रवाशी संख्या कमालीची खालावली असल्याने त्यांना आपला आर्थिक गाडा चालवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे कामगारांचे पगार चुकते करण्यासाठी राज्य सरकारकडून कोटय़वधी रुपयांचा निधी दिला जातो. दरम्यान, रोडावलेली प्रवाशी संख्या वाढवण्याबरोबरच महिलांना दिलासा देण्यासाठी सरकारने एसटीच्या तिकिटात 50 टक्के सवलत जाहीर केली आहे. त्या पार्श्वभूमीवर एसटीने ‘महिला सन्मान योजना’ जाहीर करत शुक्रवारपासून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. तेव्हापासून महिला प्रवाशांचा उत्साह वाढला असून शुक्रवारी एका दिवसात 11 लाखांहून अधिक महिलांनी एसटीने प्रवास केला आहे. पन्नास टक्के तिकिटानुसार एसटीला 2 कोटी 84 लाख रुपयांचा महसूल मिळाला असून उर्वरित पन्नास टक्के रक्कम राज्य शासन देणार आहे.सवलत जाहीर होण्याआधी एसटीने दररोज 55 लाख प्रवासी प्रवास करत होते. त्या माध्यमातून महामंडळाला 23-24 कोटी रुपयांचा महसूल मिळत होता.

महिलांना तिकिटात सवलत जाहीर झाल्यापासून गेल्या दोन दिवसांत सर्वच एसटी स्थानकात पुरुष प्रवाशांच्या तुलनेत महिलांची संख्या मोठी दिसत आहे. दरम्यान, सध्या सर्वच शाळांच्या परीक्षा सुरू असून एप्रिलमध्ये शाळांना टप्प्याटप्प्याने उन्हाळी सुट्टी लागणार आहे. त्यामुळे एसटीच्या गाडय़ा पूर्ण क्षमतेने खचाखच भरून धावतील असा विश्वास एसटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here