Home इतर महावितरणसमोर वीज बिलाची थकबाकी वसूली

महावितरणसमोर वीज बिलाची थकबाकी वसूली

45
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत असल्याने महावितरणने थकीत रक्कम वसूल करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्य सरकार वाढीव बिलांबाबत दिलासा देणार, अशा अपेक्षेत असलेल्या वीज ग्राहकांचा मात्र भ्रमनिरास झाला आहे. आता महावितरणसमोर थकबाकी वसूल करण्याचे आव्हान आहे.

राज्य सरकारच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक ग्राहकांनी वीजबिले भरली नाहीत. त्यामुळे महावितरणसमोर आर्थिक चणचण निर्माण झाली. ग्राहकांनी वीजबिल न भरल्यास जनतेला अखंडित वीजपुरवठा करणे कठीण होणार असल्याचे सांगून महावितरणने थकीत रक्कम वसूल करण्याची मोहीम पुन्हा हाती घेतली आहे. त्यानुसार महावितरणने वीजबिल वसुलीसंदर्भात परिपत्रक काढले आहे. वसुलीची जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर टाकण्यात आली असून ग्राहकांना टप्प्याटप्प्याने वीजबिल भरण्याची मुभा राहणार आहे. मात्र वाढीव बिलाबाबत सवलत मिळणार नाही.

दुसरीकडे, महावितरणचे आर्थिक संकट कमी करण्यासाठी वीज ग्राहकांनी देखील चांगलाच हातभार लावला आहे. ऑक्टोबर या एकाच महिन्यात अमरावती परिमंडळातील ४ लाख ६२ हजार वीज ग्राहकांनी ८८ कोटी ५० लाख १९ हजार ३४४ रुपयाचे वीज बिल भरले आहे.

टाळेबंदी लागू झाल्यानंतर महावितरणने ग्राहकांना स्वयंस्फूर्तीने वीज बिल भरण्याचे आवाहन केले होते. वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकाचा वीजपुरवठा देखील खंडित करण्यात आला नाही. पण, वीज बिलाच्या वाढलेल्या थकबाकीमुळे महावितरणसमोर आर्थिक संकट निर्माण झाले.

कोरोना संकट काळातही अमरावती जिल्ह्यातील २ लाख ५३ हजार ६४७ ग्राहकांनी ५४ कोटी २९ लाख ३० हजार ४३४ रुपयाची वीज देयके भरली आहेत. तर यवतमाळ जिल्ह्यातील २ लाख ८ हजार २७३ ग्राहकांनी ३४ कोटी २० लाख ८८ हजार ९११ रुपये वीज देयकापोटी भरले आहेत. आता उर्वरित थकबाकीची वसुली करण्यासाठी महावितरणने मोहीम हाती घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here