Home कोकण आज कोकण, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता

आज कोकण, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता

222
0

आज कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर, उर्वरित राज्यात कोरडे हवामान राहील. त्यामुळे उन्हाचा चटका वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.दरम्यान, सोमवारपासून राज्यात अवकाळी पावसाने उघडीप दिली असली तरी 24 मार्चपासून राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस व गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे बळीराजाची चिंता पुन्हा वाढणार असल्याचे दिसत आहे.

राज्यभरात अवकाळी पावसाने उघडीप दिल्यानंतर काल मंगळवारी (ता. 21) सकाळी मुंबईसह कोकणात जोरदार सरींनी शिडकाव केला. आजदेखील मुंबई व परिसरात अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र असल्यामुळे मुंबई व कोकणावर अवकाळीचे सावट कायम असल्याचे पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी म्हटले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात मुंबईसह, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी येथे गुरुवारपर्यंत हलक्या सरींची शक्यता आहे, तर सिंधुदुर्गात आज, बुधवारी पाऊस पडू शकेल.

राज्यात अवकाळी पावसाची उघडझाप चालू असल्याने तापमानातही चढ-उतार होत आहे. सोमवारपासून राज्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे बहुतांश भागात उकाड्यातही वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत नाशिकमधील निफाड येथे राज्यातील उच्चांकी तापमान 35 अंश सेल्सिअस नोंदवल्याची माहिती आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान 31 ते 35 अंशांच्या दरम्यान आहे. तर, किमान तापमानाचा पाराही 13 अंशांच्या पुढे आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील किमान तापमान 10 अंशांपेक्षा कमी झाले होते.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण श्रीलंकेपासून तमिळनाडू, रायलसीमा, तेलंगणा, विदर्भ ते मध्य प्रदेशपर्यंत समुद्रसपाटीपासून 900 मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. तसेच, वाऱ्यांचे प्रवाहदेखील खंडित झाल्याने पावसाला पोषक हवामान होत आहे. त्यामुळे राज्यात 24 मार्चपासून पुन्हा अवकाळी व गारपिटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या मध्य महाराष्ट्र व कोकणावर अवकाळी पावसाचे ढग असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

हवामान विभागाने धुळे, नंदुरबार, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर येथे शुक्रवार आणि शनिवारसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. म्हणजेच येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. नाशिक, अकोला, बुलडाणा, वर्धा, वाशिम, यवतमाळ येथे शनिवारी विजांसह पाऊस पडू शकेल. तोपर्यंत हलक्या सरींचा अंदाज आहे. जळगाव, अहमदनगर, पुणे येथेही पुढील चार दिवसांमध्ये अधूनमधून पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

द्राक्षबागांसाठी सर्वात कमी धोका असलेल्या‎ उन्हाळी छाटणीच्या बागा हाती येण्याच्या स्थितीत‎ असताना बेमोसमी पावसाच्या तडाख्यात सापडल्या‎ आहेत. मागील पंधरवड्यापासून वातावरणात बदल‎ होत असल्याने द्राक्षबागांवर भुरीचा प्रादुर्भाव वाढला‎ होता. यावर नियंत्रण मिळण्याचा प्रयत्न सुरू‎ असतानाच त्यात अवकाळी पावसाची भर पडली आहे. द्राक्षांच्या घडावर‎ पावसाच्या पाण्याचे स्थलांतर होऊन नायट्रोजनचे‎ प्रमाण वाढत आहे. परिणामी द्राक्षांचे मणी फुटून‎ सडवा लागल्याने 70 टक्क्यांवरील उत्पादनाला‎ फटका बसला आहे. त्यामुळे दर 40 रुपयांवरून 5‎ रुपये किलोवर आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here