छत्रपती संभाजीनगर:मराठवाडा विभागातील शासकीय अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन व औषधनिर्माण संस्थांमधील रिक्त असलेल्या वर्ग १ ते वर्ग ४ च्या रिक्त पदांसंदर्भात आमदार सतीश चव्हाण यांनी सोमवारी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले. आमदार चव्हाण म्हणाले की, ‘मराठवाडा विभागात तंत्रशिक्षणाच्या दर्जा व गुणवत्तेबाबत नावाजलेले एक शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, एक शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, १० शासकीय तंत्रनिकेतन अशा तंत्रशिक्षणाच्या शिक्षण देणाऱ्या १२ संस्था आहेत.मात्र, या संस्थांतील अनेक पदे रिक्त आहेत. ’ आमदार चव्हाण यांच्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, ‘मराठवाडा विभागातील वर्ग १ ते वर्ग ४ ची एकूण १,६९३ पदे मंजूर असून त्यापैकी १,१६२ पदे भरलेली आहेत, तर ५३१ पदे रिक्त आहेत. राज्यातील अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र पदवी व पदविका संस्थांतील शिक्षक व शिक्षकेतर पदांच्या भरती प्रक्रियेसाठी संवर्गनिहाय आरक्षण निश्चिती व बिंदुनामावलीची तपासणी सहायक आयुक्त (मागास वर्ग कक्ष) व सामान्य प्रशासन विभागाकडून करून घेण्याची कार्यवाही सुरू आहे.’