Marathwada Sathi

उन्हाळ्यात ताक आणि मसालेदार मठ्ठा, आरोग्यासाठी उत्तम

उन्हाळ्याच्या दिवसात ताक, लस्सी, मसालेदार मठ्ठ्याचे सेवन करावे असे नेहमीच सांगण्यात येते. दह्यापासून तयार होणारी ही पेयं शरीराला आतून थंडावा देण्याचे काम करतात. उन्हाळ्यात मसालेदार मठ्ठा अथवा ताक कसे फायदेशीर ठरते ताकामध्ये विटामिन ए, बी, सी, ई आणि के चे प्रमाण असते. ज्या व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती कमी असते त्यांनी नियमित ताक प्यावे. यातील हेल्दी बॅक्टेरिया, कार्बोहायड्रेट आणि लेक्टोज शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यास मदत करतात. जितके दही त्यात पाचपट पाणी मिक्स करून ताक बनवावे आणि नियमित प्यावे. जाणून घ्या ताक आणि मसालेदार मठ्ठ्याचे फायदे

पचनशक्ती चांगली होते
शरीरातील पचनशक्ती चांगली करण्यासाठी ताक वा मठ्ठा फायदेशीर ठरतो. अपचनाची समस्या दूर करून अन्नपचनासाठी मदत मिळते. यातील प्रोबायोटिक्स हे शरीरातील आतड्यांच्या विकासासाठी फायदेशीर ठरतात.

अ‍ॅसिडिटीपासून सुटका
ज्या व्यक्तींना अ‍ॅसिडिटीचा त्रास आहे त्यांच्यासाठी मठ्ठा वरदान ठरतो. जेवणानंतर मसालेदार जेवणाने त्रास होऊ नये अथवा पटकन अ‍ॅसिडिटी वाढू नये यासाठी त्वरीत ताक अथवा मठ्ठ्याचे सेवन करणे फायदेशीर ठरते. यामुळे पोटात आगआग अर्थात जळजळ होत नाही.

वजन कमी करण्यासाठीही मदत
वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यातही ताकाची मदत मिळू शकते. ताक अथवा मसालेदार मठ्ठ्यात कमी कॅलरी आणि कमी फॅट्स असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी उपयोग करून घेऊ शकता. ताक प्यायल्याने पोट पटकन भरतं आणि वजन कमी होते.

पाण्याची कमतरता होते पूर्ण
शरीरात किमान ८-१० ग्लास पाणी जाणे गरजेचे आहे. पाण्याची कमतरता शरीरात जाणवत असेल, जी उन्हाळ्यामध्ये बरेचदा जाणवते. त्यासाठी ताकाची अथवा मठ्ठ्याची मदत मिळते. घामामुळे डिहायड्रेट होणारे शरीर ताकामुळे थंड राहाते.

हाय कोलेस्ट्रॉलचा धोका टाळण्यास मदत
ताकामध्ये बायोअ‍ॅक्टिव्ह प्रोटीन असतात, जे शरीरातील कोलेस्ट्रॉलचा स्तर खाली आणण्यास मदत करतात. हृदयासंबंधित आजार न होण्यासाठी तुम्ही याचे सेवन करावे. तसंच शरीरातील रक्तप्रवाह नियंत्रित करण्यासाठीही याचा वापर होतो.

Exit mobile version