Marathwada Sathi

युवराज सिंग ऋषभ पंतच्या भेटीला ;चाहत्यांना प्रथमच दिसल्या त्या अपघाताच्या जखमा

मुंबई: भारताचा स्टार यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत अपघातात मृत्यूला मात देत पुन्हा क्रिकेटच्या मैदानात येण्यासाठी बारा होत आहे. अलीकडेच त्याने वॉटर थेरपी घेत असल्याचा फोटो आणि व्हिडीओ फोटो ट्विट केला आहे. आता माजी स्टार अष्टपैलू युवराज सिंगने त्याची भेट घेतली आहे. युवराज सिंगने गुरुवारी संध्याकाळी ऋषभ पंतसोबतचा एक फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये युवी आणि पंत सोफ्यावर बसले आहेत. पंतच्या उजव्या पायाला अजूनही पट्टी बांधलेली आहे, ज्यामुळे त्याच्या दुखापतीचा अंदाज लावता येईल.

पंतला भेटल्यानंतर युवराजने आपल्या पोस्टमध्ये लिहिले – छोटी छोटी पावलं टाकायला सुरुवात झाली आहे. हा चॅम्पियन लवकरच पुन्हा उठण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याला भेटून आणि मस्ती-मस्करी करून खूप छान वाटले. किती सकारात्मकता आहे नेहमीप्रमाणे तितकाच विनोदी. तुला खूप बळ मिळो.
गेल्या वर्षी ३० डिसेंबर रोजी तो आईला भेटण्यासाठी उत्तराखंडला जात होता. दिल्लीहून येताना डेहराडून हायवेवर रुरकीजवळ त्याची कार अनियंत्रित होऊन दुभाजकाला धडकली, त्यात तो गंभीर जखमी झाला. पहाटेच्या सुमारास कारचा अपघात झाला. मात्र, स्थानिक लोकांच्या मदतीने पंतला जळत्या गाडीतून कसेबसे बाहेर काढण्यात आले आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर लगेचच त्याला डेहराडून येथील मॅक्स रुग्णालयात नेण्यात आले, परंतु काही दिवस उपचार घेतल्यानंतर पंत यांना एअरलिफ्ट करून मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून डिस्चार्ज मिळाल्यानंतर तो आता घरी असून, तो वेगाने बरा होत आहे.
पंत कधीपर्यंत पूर्ण बरा होईल याबाबत बीसीसीआयकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, परंतु त्याच्या अनुपस्थितीत डेव्हिड वॉर्नरला आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार बनवण्यात आले आहे, तर अक्षर पटेल उपकर्णधाराची भूमिका बजावणार आहे. पंतला लवकरच मैदानात पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत.आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषकापूर्वी तो बरा होईल, अशी आशा आहे. १२ वर्षांपूर्वी कॅन्सरशी झुंज देत असताना युवराज सिंगने टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवले होते. कॅन्सरवर उपचार घेतल्यानंतर युवीने जोरदार पुनरागमन केले. अशा परिस्थितीत युवराजच्या प्रेरणेने पंतच्या प्रकृतीत सुधारणा होण्यास मदत होईल.

Exit mobile version