Marathwada Sathi

जगविख्यात फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांचे निधन…!

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : आपल्या फुटबॉल कौशल्याने संपूर्ण जगभर नावाजलेले अर्जेंटीनाचे माजी फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांचे काल (२५ नोव्हें.) रात्री निधन झाले.मॅरेडोना यांचे वय ६० वर्षे होते. ह्र्यदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आहे. मॅरेडोना यांना दोन आठवड्यांपूर्वीही ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यावेळी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण काल (२५ नोव्हें.)पुन्हा एकदा मॅरेडोना यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.

दिएगो मॅरेडोना यांच्या विषयी थोडक्यात

अर्जेंटीनाला १९८६ साली फुटबॉल विश्वचषक जिंकवून देण्यात मॅरेडोना यांचा मोलाचा वाटा होता. त्यांना फुटबॉल खेळतांना बघून चाहत्यांनी त्यांना चाहत्यांनी देवत्व बहाल केले होते. मात्र, ‘आपण फुटबॉलचे देव नसून एक सामान्य फुटबॉलपटू आहोत’, असे वक्तव्य मॅरेडोना यांनी कोलकातामध्ये आल्यावर एका कार्यक्रमात केले.मॅरेडोना भारतामध्ये पहिल्यांदा २००८ साली आले होते. त्यानंतर त्यांचा भारताचा दुसरा दौरा २०१७ मध्ये तब्बल ९ वर्षांनी झाला होता. यावेळी मॅरेडोना यांची एक झलक पाहण्यासाठी भारतामधून बरेच चाहते कोलकाता येथे दाखल झाले होते. मॅरेडोना यांच्या नावाने कोलकातामध्ये एक पार्क उभारण्यात आले होते. या पार्कचे उद्घाटन मॅरेडोना यांच्याच हस्ते करण्यात आले. या पार्कमध्ये उभारण्यात आलेल्या त्यांच्या १२ फुटी पुतळ्याचे अनावरण मॅरेडोना यांच्याच हस्ते करण्यात आले. या पुतळ्याच्या हातात १९८६ चा विश्वचषक दाखवण्यात आला होता.

‘एक दिवस आम्ही दोघेही वर फुटबॉल खेळू’.

दिएगो मॅरेडोना यांच्या निधनामुळे संपूर्ण क्रीडा विश्वावर शोककळा पसरली आहे. सर्व क्षेत्रातील मान्यवर मॅरेडोना यांना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहत आहेत. मॅरेडोना यांचे चांगले मित्र असलेले आणि विश्वविख्यात फुटबॉलपटू पेले यांनीदेखील सोशल मीडियावरुन आपल्या मित्राच्या निधनानंतर श्रद्धांजली वाहिली आहे. पेले यांनी एक ट्विट केलं आहे, त्यात म्हटलं आहे की, ‘ही खूप दुर्दैवी बातमी आहे. आज मी माझा एक चांगला मित्र आणि जगाने एक महान खेळाडू गमावला. त्याच्याबद्दल खूप काही बोलण्यासारखं आहे, सध्या त्याच्या कुटुंबाला बळ मिळो हीच माझी इच्छा आहे.’एक दिवस आम्ही दोघेही वर फुटबॉल खेळू’.

Exit mobile version