Marathwada Sathi

वरळी-सी फेसवर अपघातात महिलेचा मृत्यू

वरळी सी फेस येथे भरधाव वेगाने येणाऱ्या कारच्या धडकेत मॉर्निंग वॉक करत असलेल्या अल्ट्रुइस्ट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राजलक्ष्मी राजकृष्णन (वय ५८) यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली.या अपघातात गाडीचा चालकही जखमी झाला असून, वरळी पोलिसांनी गुन्हा नोंदवत चालकाला बेड्या ठोकल्या आहेत.

माटुंगा परिसरात राहणाऱ्या राजलक्ष्मी या महापे येथील अल्ट्रुइस्ट कंपनीत सीईओ पदावर कार्यरत होत्या. रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्या चालण्यासाठी घराबाहेर पडल्या. वरळी डेअरी समाेरून चालत जात असताना सकाळी साडेसहाच्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे कार राजलक्ष्मी यांना धडक देत दुभाजकावर आदळली. या धडकेत त्या दूरवर फेकल्या गेल्या. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्याने स्थानिक आणि पोलिसांच्या मदतीने त्यांना नायर रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वी मृत घोषित केले. यामध्ये गाडीचाही चुराडा झाला आहे.

वरळी सी-फेस परिसरात किनारी मार्गाचे काम सुरू असल्यामुळे तेथे चालण्यासाठी येणाऱ्यांना जागा अपुरी पडते. त्यामुळे अनेकांना समोरील पदपथावर व रस्त्यावर जीव मुठीत घेऊन चालावे लागत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तसेच, चालकही सुसाट असतात. बेदरकारपणे वाहन चालविणारा तरुण नशेत चालक सुमेर मर्चंट (२३) याच्या विरोधात बेदरकारपणे वाहन चालवल्याचा गुन्हा नोंदवत त्याला अटक करण्यात आली. तो ताडदेव येथील रहिवासी आहे. तो एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. त्यालाही अपघातात दुखापत झाली आहे. यावेळी कारमध्ये दोन मुली आणि मुलगा होती. तो नशेत असल्याची माहिती समोर येत आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. याबाबत वरळी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version