Home औरंगाबाद ग्रामपंचात निवडणुकीत उमेदवारांची माघारी..

ग्रामपंचात निवडणुकीत उमेदवारांची माघारी..

139
0


मराठवाडा साथी न्यूज
औरंगाबाद : औरंगाबादमधील वाळूज ग्रामपंचायतीच्या निवडणुका चर्चेची ठरणार आहेत. निवडणुकीत वरचढ ठरणाऱ्या उमेदवारांनी माघार घ्यावी, यासाठी धनदांडग्या मातब्बर उमेदवारांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू करून त्यांना विविध प्रकारचे प्रलोभने दाखविली जात असल्याचे चित्र उद्योगनगरीत बघायला मिळत आहे.वाळूज औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या रांजणगाव, जोगेश्वरी, आंबेलोहळ, वाळूज, नारायणपूर, वळदगाव, पंढरपूर, तिसगाव, पाटोदा आदी ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारीला होणार आहे. या अर्थसंपन्न ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी विविध राजकीय पक्ष गावपातळीवरील पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. या परिसरातील ग्रामपंचायतींना औद्योगिक क्षेत्रातील कारखान्याकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा कर मिळत असतो. याच बरोबर जिल्हा परिषद, पंचायत समिती व शासनाकडून विकासकामासाठी ग्रामपंचायतींना मोठा निधी मिळत असल्याने या ग्रामपंचायती अर्थिकदृष्ट्या सक्षम म्हणून ओळखल्या जातात.

उद्योगनगरीतील ग्रामपंचायतीची सत्ता ताब्यात घेण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून डावपेच आखण्याचे काम वेगात सुरू आहे. या निवडणुकीत सरपंच व सदस्यपदी वर्णी लागावी, यासाठी गावपातळीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी करीत नामांकन अर्जही दाखल केले आहे. वाळूज, रांजणगाव, जोगेश्वरी, पंढरपूर या ठिकाणी मातब्बर व धनदांडग्या उमेदवारांनी स्वत:बरोबर कुटुंबातील सदस्यांचे अर्ज भरल्याने या मातब्बरांचे समर्थक व सर्वसामान्य नागरिकांत मात्र नाराजीचा सूर उमटत आहे. या मातब्बर उमेदवारांकडून घराणेशाहीला प्राधान्य दिले जात असल्याने त्यांचे समर्थक नाराज असल्याचे चित्र या परिसरात बघायला मिळत आहे.

उमेदवारांच्या माघारी
३० डिसेंबरला नामांकन अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर बहुतांश उमेदवारांचे अर्ज छाननीत वैध ठरले आहे. आपल्याला वरचढ ठरणाऱ्या उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घ्यावी, यासाठी मातब्बर धनदांडग्या उमेदवारांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहे. धनदांडग्या उमेदवारांकडून वरचढ ठरणाऱ्या उमेदवारांची मनधरणी सुरू केली असून, त्यांना विविध प्रकारची प्रलोभनही दिली जात असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. ४ जानेवारीला नामांकन अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असून, वरचढ ठरणाऱ्या उमेदवारांनी माघार घ्यावी, यासाठी मातब्बर उमेदवारांचा खिसा चांगलाच रिकामा होत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here