Marathwada Sathi

राज्यपाल 12 सदस्यांची नियुक्ती करणार का ?

मराठवाडा साथी न्यूज
मुंबई । राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर पहिल्यांदाच राज्यपाल नियुक्त १२ विधान परिषदेच्या सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामध्ये महाविकास आघाडीत एकमत होणे अपेक्षित आहे. गुरुवारी होणाऱ्या राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत हा निर्णय होईल. राज्यपाल आणि मुख्यमंत्री वादाच्या पार्श्वभूमीवर या १२ सदस्यांना राज्यपाल मान्यता देणार आहे का?
गुरुवारी प्रस्तावाला मिळणार मुहूर्त
कोरोना संकटाच्या काळात पुढे ढकलल्या गेलेल्या 12 राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या प्रस्तावाला गुरुवारचा मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. गुरुवारी होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत 12 राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 जागांच्या नियुक्तीबाबत महाविकास आघाडी सरकारच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मागच्या कॅबिनेट बैठकीत हा प्रस्ताव येणार अशी चर्चा सुरु होती. पण काही कारणास्तव हा प्रस्ताव पुढे ढकलला होता.
खोतकरांना देणार का सदस्यत्व?
पक्षाच्या विरोधात जाऊन लोकसभा निवडणुकीत बंड करणाऱ्या माजी मंत्री अर्जुन खोतकरांचे नाव या १२ विधान परिषद सदस्यांमध्ये आल्याने चर्चा वाढली आहे. कारण दानवेंच्या विरोधात खोतकरांनी जे बंड केले, त्यावेळी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंचेही ऐकले नव्हते. ते बंड थंड करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागली होती. त्यानंतर खोतकरांचे आणि मातोश्रीचे संबंध तेवढे चांगले नव्हते. त्या पार्श्वभूमीवर खोतकरांना सदस्यत्व मिळेल का? असा प्रश्न आहे.
राज्यपालांच्या निर्णयाकडे लक्ष
मागच्या कॅबिनेट बैठकीआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यात बैठकही झाली होती. मात्र ऐनवेळी प्रस्ताव न आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. परंतु, आता राज्यपाल नियुक्त 12 नावांना मंत्रिमंडळाची मंजूरी देऊन ती नावे मंजूरीसाठी राज्यपालांकडे पाठवली जाणार आहेत. महाविकास आघाडी आणि राज्यपाल यांच्यात झालेल्या संघर्षानंतर राज्यपाल या नावांना पसंती देणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
राष्ट्रवादीकडून खडसेंचे नाव
सर्वात महत्वाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे यांचे नाव असणार का? याबाबत देखील राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. मात्र अद्याप एकनाथ खडसेंचे नाव निश्चित झालेले नाही, असे अधिकृत सुत्रांनी सांगितले. शेवटच्या क्षणी खडसेंचं नाव येणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस प्रत्येकी चार नाव देणार आहेत.
सेनेकडून नार्वेकर
शिवसेनेने पक्षाचे सचिव आणि ऐकेकाळी उद्धव ठाकरेंचे स्वियसहाय्यक राहीलेल्या मिलिंद नार्वेकरांचे नाव यादीत घेतले आहे. तर जालन्याचे माजी आमदार आणि माजी मंत्री अर्जुन खोतकरांचे नावही चर्चेत आहे. त्यामुळे खोतकर की नार्वेकर असा प्रश्न उपस्थित होणार आहे.

Exit mobile version