Marathwada Sathi

लँडलाईनवर कॉल करताना अगोदर करावा लागेल “०” डायल

नवी दिल्ली : येणाऱ्या नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजे जानेवारी महिन्यापासून लँडलाईनवरून मोबाईलवर कॉल करायचा असेल तर मोबाईल क्रमांकाआधी शून्य (Zero) लावणं आवश्यक आहे. अन्यथा तो फोन लागणार नाही. दूरसंचार विभागानं टेलिकॉम रेग्युलेटरी ऍथॉरिटी ऑफ इंडिया (Telecom Regulatory Authority of India) अर्थात ट्रायच्या (TRAI) शिफारशीचा स्वीकार करत हा नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. लँडलाईन आणि मोबाईल सेवा यासाठी पुरेसे क्रमांक उपलब्ध व्हावेत या दृष्टीनं केंद्र सरकारनं हे पाऊल उचललं आहे. 15 जानेवारीपासून संपूर्ण देशात हा नियम लागू होईल. जे लोक मोबाईल क्रमांक डायल करण्यापूर्वी शून्य लावणार नाहीत त्यांना त्या संदर्भातील सूचना देणारा रेकोर्डेड मेसेज ऐकू येईल.

भारतात दहा अंकी मोबाईल क्रमाकांचा वापर होतो. शून्य आणि एकने सुरू होणारे क्रमांक खास सेवांसाठी वापरले जातात. यामुळे पूर्वी सर्वसाधारणपणे मोबाईल क्रमांक 9 ने सुरू होत असत. आता 8, 7 आणि 6 पासून सुरू होणारे मोबाईल क्रमांकही येण्यास सुरुवात झाली आहे. या अंकांच्या सर्व क्रमांकांचा विचार केला तर देशात सध्या 115 कोटी मोबाईल क्रमांक उपलब्ध आहेत. मात्र 9 पासून सुरू होणारे क्रमांक जवळपास संपले आहेत. आता यापुढे 9 पासून सुरू होणारे आणखी मोबाईल क्रमांक देता येणं शक्य नाही. ही समस्या दूर करण्यासाठी मोबाईल क्रमाकांच्या आधी 0 लावण्याची पद्धत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Exit mobile version