Marathwada Sathi

‘जी २०’साठी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत चोरीच्या विजेने!

नागपूर: उपराजधानीत आयोजित जी-२० अंतर्गत सी-२० परिषदेसाठी येणाऱ्या विदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी रस्त्यांवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. परंतु, त्यासाठी चोरीची वीज वापरली जात आहे.

उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृह शहर असलेल्या नागपुरात २१ आणि २२ मार्च रोजी जी-२० अंतर्गत सी-२० परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेला विविध देशातील सुमारे ६० तर देशाच्या वेगवेगळ्या राज्यातून २५० असे एकूण ३०० पाहुणे येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी नागपूर महापालिकेसह शासनाच्या विविध विभागाकडून रस्त्यांवर आकर्षक रोषणाई व सौंदर्यीकरण केले जात आहे. परंतु वर्धा रोड, सिव्हिल लाईन्स परिसरात आकर्षक रोषणाईसाठी थेट महावितरणच्या वीज वितरण पेटीत तार जोडून नियमबाह्य वीज घेतली आहे.

काही ठिकाणी नागपूर महापालिकेच्या पथदिव्याला जोडून नियमबाह्य वीज घेतली आहे. पथदिव्याची वीज महापालिकेला ७.५१ रुपये प्रतियुनिट या सवलतीच्या दरात मिळते. तात्पुरते मीटर घेतल्यावर वीज सुमारे १३ रुपये युनिट दराने घ्यावी लागते. त्यामुळे या पद्धतीची जोडणीही नियमबाह्य असल्याचे वीज क्षेत्रातील जाणकार सांगतात.

सिव्हिल लाईन्सच्या काही भागात रोषणाईसाठी घेतलेली वीज अनधिकृत आढळल्यावर तातडीने ती खंडित करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना येथे तात्पुरती जोडणी घेण्याची सूचना केली, असे महावितरणच्या सिव्हिल लाईन्स येथील उपविभागीय अधिकारी नितीन उज्जैनकर म्हणाले. नागपूर महापालिकेचे उपायुक्त मिलिंद मेश्राम यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

जी- २० साठी गेल्या दोन दिवसांत धरमपेठ भागात २, सदर भागात २, सोमलवाडा भागात ५, अजनीत ३ अशा एकूण १२ तात्पूरत्या जोडण्या दिल्याचे महावितरणच्या जनसंपर्क विभागाने सांगितले. ‘लोकसत्ता’ने एका अधिकाऱ्याला याबाबतच्या माहितीसाठी संपर्क केल्यावर वीज जोडण्या दिल्याची सूत्रांची माहिती आहे.

Exit mobile version