Marathwada Sathi

ज्येष्ठ अभिनेते समीर खक्कर यांचे निधन

मनोरंजनसृष्टीतून एक दुःखद बातमी आहे. दूरदर्शनवरील गाजलेली मालिका ‘नुक्कड’मध्ये खोपडी ही व्यक्तिरेखा साकारणारे ज्येष्ठ अभिनेते समीर खक्कर यांचे आज १५ मार्च निधन झाले आहे. ते ७१ वर्षांचे होते. समीर खक्कर यांनी त्याच्या कारकिर्दीत अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले होते. पण ते ‘नुक्कड’ या टीव्ही मालिकेतील खोपडी या भूमिकेसाठी विशेष ओळखले जायचे. समीर खक्कर तब्बल ३८ वर्षांपासून अभिनय क्षेत्रात काम करत होते. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे.समीर खक्कर यांचा मुलगा गणेश खक्कर यांनी सांगितल्यानुसार, मंगळवारी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता, त्यानंतर बेशुद्ध पडले. तातडीने डॉक्टरांना बोलावण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यास सांगितले. यानंतर त्यांना लघवीचा त्रास होऊ लागला. त्यांचा शेवटचा काळ बेशुद्धावस्थेत गेला. लघवीचा त्रास झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. पण नंतर त्यांचे हृदय बंद पडले. मल्टिपल ऑर्गन निकामी झाल्याने पहाटे ४.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. समीर यांना बोरिवलीच्या एमएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
मधल्या काळात समीर यांनी इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला आणि १९९६ मध्ये ते अमेरिकेमध्ये स्थायिक झाले होते. नंतर, ते परत आले आणि त्यांनी पुन्हा काम सुरू केले. समीर यांनी सलमान खानच्या ‘जय हो’ चित्रपटात काम केले होते. याशिवाय त्यांनी गुजराती नाटकांमध्येही भूमिका केल्या होत्या.
अमेरिकेतून परतल्यानंतर आपण चांगल्या भूमिकांच्या शोधात असल्याचे त्यांनी एकदा म्हटले होते. “प्रत्येकजण कामाच्या शोधात असतो आणि मीही. आणि काम शोधणे म्हणजे कामासाठी विचारणे आणि नोकरीसाठी अर्ज करणे. अभिनेत्यांच्या बाबतीत, प्रत्येक चित्रपट किंवा शो हा रोजचा व्यायाम आहे. पण मी एक वाईट सेल्समन आहे. मला आशा आहे की जे लोक मला ओळखतात ते मला कामाची ऑफर देतील. मला शेवटच्या श्वासापर्यंत काम करायचे आहे. मला आयुष्यभर लोकांचे मनोरंजन करायचे आहे, मी अजून थकलेलो नाही,” असे समीर खक्कर म्हणाले होते.
समीर यांनी ‘नुक्कड’मधून करिअरला सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी शाहरुख खानच्या ‘सर्कस’मध्येही काम केले. या मालिकेत त्यांनी चिंतामणीची भूमिका साकारली होती. ‘श्रीमान श्रीमती’ या मालिकेतील समीर यांनी साकारलेली चित्रपट दिग्दर्शक टोटोची भूमिकाही प्रेक्षकांना आवडली होती. याशिवाय ‘मनोरंजन’, ‘नया नुक्कड’, ‘अदालत’ या त्यांच्या गाजलेल्या मालिका आहेत. सुरभी चंदना आणि नमित खन्ना यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘संजीवनी’मध्ये ते दिसले होते.
अमेरिकेतून परतल्यानंतर त्यांनी झी ५ वरील ‘सनफ्लॉवर’ या वेब सिरीज काम केले होते. यूट्यूबवर रिलीज झालेल्या ‘पुराना प्यार’ या शॉर्ट फिल्ममध्येही ते दिसले. २०२० मध्ये ते नवाजुद्दीन सिद्दीकीच्या सिरीयस मॅन या चित्रपटात झळकले होते. यात त्यांनी राजकारण्याची भूमिका साकारली होती.
समीर खक्कर यांनी १९८७ मध्ये आलेल्या जवाब हम देंगे या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते. याशिवाय त्यांनी मेरा शिकार, शहंशाह, गुरु, नफरत की आंधी, परिंदा, शहजादे, वर्दी, अव्वल नंबर, धरती पुत्र आणि हम हैं कमाल या चित्रपटांमध्ये अभिनय केला होता

Exit mobile version