Home होम वाहनप्रवास आता मुखपट्टीमुक्त…..!

वाहनप्रवास आता मुखपट्टीमुक्त…..!

253
0

मराठवाडा साथी
मुंबई : करोना रुग्णांच्या संख्येत होणारी घट आणि लसीकरणाची सुरुवात या बाबी विचारात घेऊन मुंबईमध्ये खासगी वाहनांतून मुखपट्टीविना प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र, सार्वजनिक वाहनांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मुखपट्टीचा वापर बंधनकारकच आहे.करोना विषाणू संसर्गाचे प्रमाण घटत असल्याने खासगी वाहनांतही मुखपट्टीची आवश्यकता आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. खासगी वाहनांमध्ये मुखपट्टी वापरण्याची सक्ती रद्द करावी, अशी मागणीही करण्यात येत होती. याबाबत विचार करून खासगी वाहनांमधून मुखपट्टीविना प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करू नये, असे आदेश मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘क्लिन अप मार्शल’ना दिले आहेत. त्यामुळे आता खासगी वाहनांतून मुखपट्टीमुक्त प्रवास करता येईल.
करोना विषाणू साथीच्या प्रतिबंधासाठी राज्य सरकारने सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या सर्वाना मुखपट्टीचा वापर बंधनकारक केला होता. मुखपट्टीविना फिरणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले होते. त्यानुसार मुंबई महापालिका प्रशासनातर्फे २० एप्रिल २०२० पासून मुखपट्टीविना फिरणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येत होती.
मुखपट्टीविना फिरणाऱ्यांकडून सुरुवातीला एक हजार रुपये दंड घेण्यात येत होता, मात्र त्यावरून वाद होऊ लागल्याने दंडाची रक्कम २०० रुपये करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणे, बाजार, मंडया आदी ठिकाणी कारवाई करण्यासाठी पालिकेने पथके तैनात केली आहेत. पालिका कर्मचारी, क्लिन अप मार्शल यांचा पथकांमध्ये समावेश आहे. दंडात्मक कारवाई करण्यात येत असली तरीही आजही अनेक जण मुखपट्टीविना सार्वजनिक ठिकाणी फिरत असल्याचे निदर्शनास येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here