Marathwada Sathi

औरंगाबादेत वाहन चोरांचा धुमाकूळ सुरूच

औरंगाबाद : शहरात वाहन चोरानी अक्षरशः धुमाकूळ घातला असून पोलिसांच्या नाकाबंदीला भेदून पुन्हा पाच दुचाकी शहराच्या विविध भागातून लंपास केल्या आहे. विशेष म्हणजे वाढत्या वाहन चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांची पथके विविध भागात गेल्या दोन आठवड्यापासून नाकाबंदी करत होते. आता पोलीस देखीक थकल्याचे दिसून येत आहे. चोरटे पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाहने लांबवत आहेत.
पहिल्या घटनेत, व्यापारी विजय राधाकृष्ण पेंढारकर (५०, रा. गोकुळवाडी, औरंगपुरा) यांनी २३ फेब्रुवारी रोजी रात्री नऊच्या सुमारास घरासमोर दुचाकी (एमएच-२०-बीएस-५८७४) उभी केली होती. चोराने मध्यरात्री हँडल लॉक तोडून दुचाकी लंपास केली. दुसऱ्या घटनेत, बेकरी चालक मुजीब सय्यद शोकत सय्यद (२९, रा. चिस्तीया कॉलनी, सिडको एन-६) यांनी ९ फेब्रुवारी रोजी रात्री साडे बाराच्या दरम्यान दुचाकी (एमएच-२०-इएक्स-२३७६) त्यांच्या बेकरीसमोर उभी केली होती. मध्यरात्री चोराने दुचाकी हँडल लॉक तोडून लांबवली. तिसऱ्या घटनेत, सेवानिवृत्त विजय आनंदराव इंगळे (५९, रा. प्लॉट क्र. १०, बी, न्यू शांतीनिकेतन कॉलनी, जवाहर कॉलनी) यांनी १ मार्च रोजी दुपारी बाराच्या सुमारास महेश नगरातील काबरा हॉस्पिटलसमोर दुचाकी (एमएच-२०-बीएम-१४७०) उभी केली होती. अवघ्या तीन तासात दुचाकी चोराने लांबवली. चौथ्या घटनेत, सेल्समन अविनाश नामदेव गुंजाळकर (५१, रा. गंगाधन हनुमान मंदिरजवळ, नवाबपुरा) यांनी १ मार्च रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास दुचाकी (एमएच-२०-सीए-४२५८) घरासमोर उभी केली होती. मध्यरात्री चोराने दुचाकी हँडल लॉक तोडून लंपास केली. तर कौटुंबिक न्यायालयात नौकरीला असलेले दिलीप सुखदेव थोरात (४६, रा. न्यायनगर, गारखेडा परिसर) यांनी २६ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊच्या सुमारास दुचाकी (एमएच-२०-एएन-७५१३) कार्यालयासमोर उभी केली होती. चोराने त्यांची दुचाकी हँडल लॉक तोडून लंपास केली. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Exit mobile version