Marathwada Sathi

वरवरा राव यांच्यावर नानावटी रुग्णालयांत होणार उपचार

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी तळोजा तुरुंगात असलेले आरोपी, ८२ वर्षीय ज्येष्ठ तेलुगु कवी वरवरा राव यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. वरवरा राव यांची प्रकृती काही दिवसांपासून खालावली आहे. त्यांच्या वैद्यकीय उपचारासाठी पत्नी हेमलता यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर सुनावणी करत असताना उच्च न्यायालयाने राव यांच्यावर पुढील १५ दिवस ‘नानावटी रुग्णालयात’ उपचार करण्याची परवानगी दिली आहे .

‘तळोजा तुरुंगात योग्य काळजी घेतली जात नसल्याने राव यांची प्रकृती गंभीर बनली आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा नानावटी रुग्णालयात हलवण्याचे निर्देश द्यावेत आणि त्यांची जामिनावर मुक्तता करावी’, अशी याचिका राव यांच्या पत्नी हेमलता यांनी अॅड. आर. सत्यनारायणन यांच्यामार्फत केली होती. त्यानंतर आज मुख्य सरकारी वकील दीपक ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात म्हणणे मांडले होते.

उच्च न्यायालयाची परवानगी घेतल्याविना वरवरा राव यांना नानावटी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येऊ नये, असेही खंडपीठाने आदेशात स्पष्ट केले आहे. वरवरा राव यांचे कुटुंबीय राव यांना नानावटी रुग्णालयात त्यांना भेटू शकतील, मात्र रुग्णालयाचे नियम पाळून. राज्य सरकारने राव यांची वैद्यकीय तपासणी व चाचण्या केल्यानंतर त्याविषयीचा अहवाल न्यायालयात सादर करावा, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.राव यांच्या याचिका व अर्जाविषयीची पुढील सुनावणी ३ डिसेंबर रोजी घेण्यात येईल. न्यायमूर्ती संभाजी शिंदे व न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने आदेशात स्पष्ट केले.

Exit mobile version