Marathwada Sathi

शेतकरी हिंसाचाराची केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचाराची गंभीर दखल केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गृह मंत्रालयाने दिल्ली पोलिसांसहसर्व शेजारच्या राज्यातील पोलिसांना गोंधळ घालणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर 26 जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचाराची चौकशी दिल्ली पोलिसांची क्राईम ब्रँच करणार आहे.या संपूर्ण प्रकरणात क्राईम ब्रँच SIT ची स्थापना करणार असून त्याच्यामार्फत या प्रकरणाची चौकशी होईल. त्याचबरोबर आज (बुधवार) संध्याकाळपर्यंत दिल्ली आणि एनसीआर परिसरातील सर्व आंदोलनाच्या जागा रिकाम्या करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्देशांचं पालन न करणाऱ्या शेतकरी संघटनांवर कठोर कारवाईची शक्यता देखील नाकारता येत नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

फरिदाबाद, नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबाद या भागात विशेष दल तैनात करण्यात येणार आहे. दिल्लीमध्ये मंगळवारी झालेल्या हिंसाचारात 230 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झाले आहेत. त्याचबरोबर बाहेरच्या जिल्ह्यातही 78 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या हिंसाचारानंतर दिल्लीतील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल करण्यात येत आहेत. दंग्यांना चिथावणी देणे, मारहाण, सरकारी वाहनांचं नुकसान करणे यासह विविध गुन्ह्यातील कलमांच्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.

Exit mobile version