Marathwada Sathi

मुंबईतील दुर्दैवी घटना ; पाण्याचा फुगा डोक्याला लागल्यामुळे तरुणाचा मृत्यू

मुंबई : ‘होली है’ म्हणत अवघा महाराष्ट्र रंगात न्हाहून निघाला. पण रंगाची उधळण करत असताना एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. पाण्याचा फुगा लागल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मुंबईत घडली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप धावडे (वय ४१ ) असं मृत व्यक्तीचे नाव आहे. धावडे हे एका शेअर ट्रेडिंग कंपनीमध्ये कामाला होते. सोमवारी रात्री विलेपार्लेच्या शिवाजीनगरमधील सिद्धिविनायक सोसायटीमध्ये हा प्रकार घडला. सोमवारी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास दिलीप धावडे हे कुटुंबीयांसाठी पुरणपोळी घेऊन येत होते.

त्याच वेळी लहान मुलं आणि मोठ्या माणसांचा एक गट एकमेकांवर पाण्याचे फुगे फेकत होता. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवरही ते पाण्याचे फुगे फेकत होते. यातला एक फुगा धावडे यांच्या डोक्याला लागला. फुगा जसा डोक्याला लागला धावडे हे खाली कोसळले.

अचानक झालेल्या या घटनेमुळे एकच गोंधळ उडाली. स्थानिकांनी लगेच धावडे यांना रुग्णालयात दाखल केलं. पण डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं. धावडे यांचा मृतदेह कूपर हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून अपघाती मृत्यूची नोंद केली आहे, असं वृत्त दैनिक लोकमतने दिले आहे. मृत दिलीप धागडे यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं आहे. त्यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version