Marathwada Sathi

विदर्भालात वीज पडून दोघांचा मृत्यू

नागपूर : अवकाळी पाऊस आणि वादळाने संपूर्ण विदर्भाला झोडपले. अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वे तालुक्यातील मलातपूर येथे गोपाल मनोहर करपती यांचा वीज पडून मृत्यू झाला. तर विनायक जयराम ठाकर, जगदीश मंडाळे जखमी झाले. अकोला जिल्ह्यातही मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे वीज पडून एकाचा मृत्यू झाला. तर दहा शेळ्या मरण पावल्या.

गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे पश्चिम आणि पूर्व विदर्भाला चांगलाच फटका बसला. शुक्रवारी अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळला. मध्यरात्रीपासून सुरू असलेला पाऊस अजूनही कायम आहे. अकोला जिल्ह्यात रात्री अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. अमरावती जिल्ह्यातही वादळी पावसामुळे अनेक घरांचे छप्पर उडाले. वर्धा जिल्ह्यातही रात्री अनेक भागांत गारपीट झाली. पुलगावला पावसाने झोडपले. शनिवारीदेखील पाऊस कायम होता. गडचिरोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसासह वादळाचा तडाखा बसला. दक्षिण गडचिरोली भागाला पावसाचा सर्वाधिक फटका बसला.

चंद्रपूर जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. तर यवतमाळ जिल्ह्यातही पहाटे मुसळधार पावसाने हजेरी लावली. भंडारा जिल्ह्यातदेखील सकाळपासूनच रिमझिम पावसाची सुरुवात झाली. नागपूर जिल्हा व शहरातही शुक्रवार दुपारपासूनच पावसाचे तांडव कायम आहे. विजांच्या कडकडाटासह रात्रभर पावसाने हजेरी लावली. तर शनिवारीदेखील ढगांच्या गडगडाटास पाऊस कायम होता

Exit mobile version