मराठवाडा साथी
औरंगाबाद :जालना रोडवर सकाळी ११ ते दुपारी २ यावेळात होणारी वाहतुक कोंडी दूर करण्यासाठी अमरप्रित आणि आकाशवाणी चौकातील वळणे बंद करण्याचा निर्णय पोलिस आयुक्तांनी घेतला. या आदेशाची मुदत ५ जानेवारीला संपणार आहे. पण या निर्णयामुळे जालना रोडवरील वाहतुक सुरळीत होत असल्याचे पाहून हा निर्णय कायम करण्याचा प्रस्ताव पोलिस प्रशासनाचा विचाधीन आहे.
काय आहे निर्णय?
जालना रोडवर सकाळी १० पासून दुपारी २ पर्यंत अमरप्रित आणि आकाशवाणी चौकात वाहतुक कोंडी होते. त्यामुळे या दोन्ही चौकातील वाहतुक सुरळीत करण्यासाठी सेव्हन हिल्सकडून येणारी वाहने आणि क्रांती चौकाकडून येणारी वाहनांची थेट वाहतुक सुरू ठेवली आहे. त्यामुळे चौकातील सिग्नलमुळे होणारी वाहतुक कोंडी जवळपास संपली आहे.
अमरप्रित चौकातील परिस्थिती
हा आदेश काढल्याने अमरप्रित चौकात क्रांतीचौक उड्डाणपुलापर्यंत वाहनांची लागणार रांग थांबली. तर आकाशवाणी चौकात मोंढानाका सिंग्नलपर्यंत लागणारी रांग संपली. या दोन्ही चौकात सिग्नल क्रॉस करण्यासाठी 20 ते 25 मिनिटांचा कालावधी चार चाकी वाहनांना लागत होता. तो या नव्या आदेशाने संपुष्टात आला. चारचाकी वाहनांसाठी हा आदेश वरदान ठरला आहे.

आता होते कोंडी
जालना रोडवर दोन्ही बाजूने केबलसाठी खोदकाम सुरू आहे. त्यामुळे रस्त्याच्या लगतच्या व्यापारी पेठांमध्ये येणारी वाहने रस्त्यावर लागता आहेत. त्यामुळे संपुर्ण रस्ताभर वाहतुक कोंडी होते आहे. त्यात अमरप्रित चौकापासून ते सेव्हन हिल्स चौकापर्यंत वाहतुक कोंडी होते आहे. ही कोंडी फोडण्यासाठीही हा निर्णय अतिशय फायदेशीर ठरला आहे.
निर्णय काम करण्याचा प्रस्ताव
या दोन्ही चौकातील वाहतुक सुरळीत करण्यासाठी हा नवा आदेश कायम करण्याचा प्रस्ताव पोलिस प्रशासनाच्या विचाराधीन आहे. जालना रोडला पर्यायी रस्ता तयार झालेला नसल्याने जालना रोडवरून जाणाऱ्या वाहनांची संख्या कमी होण्याचा काही नवीन पर्याय नाही. त्यामुळे हाच नवा आदेश त्यावर इलाज होऊ शकतो, असे सर्वसामान्य नागरिकांचे म्हणणे आहे.