Marathwada Sathi

यावर्षी ‘महामानवाला’ करता येणार ऑनलाइन अभिवादन…!

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ यांचा अंत्यविधी मुंबईत दादर चौपाटी परिसरात झाला, ती जागा चैत्यभूमी स्मारक म्हणून सर्वांसाठीच वंदनीय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी म्हणजेच दरवर्षी ६ डिसेंबर रोजी ‘चैत्यभूमी’ येथे अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने अनुयायी येतात.मात्र,यावर्षी कोरोनाच्या वाढलेल्या प्रादुर्भावामुळे आणि कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने यावर्षी महापरिनिर्वाण दिनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज पार्क’ वर कोणत्याही नागरी सुविधा न देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आंबेडकरी अनुयायांना चैत्यभूमीचे, शासकीय सलामीचे ऑनलाइन प्रक्षेपण केले जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली.

प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे शासकीय मानवंदना प्रदान करून हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. तरीही कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक मार्गदर्शक तत्वांचे पालन करता यावे, कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून एकत्र येण्यावर निर्बंध आहेत.

त्यामुळे यावर्षी शासकीय मानवंदना कार्यक्रमाचे ऑनलाईन व प्रसारमाध्यमांच्या साहाय्याने थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे, जेणेकरून सर्वांनाच आपआपल्या घरी राहून, स्थानिक स्तरावरून अभिवादन करता येईल अशी माहिती जयस्वाल यांनी दिली.

Exit mobile version