Home महाराष्ट्र राष्ट्रवादीच्या बैठकीत ‘हा ‘ मुद्दा ठरला…

राष्ट्रवादीच्या बैठकीत ‘हा ‘ मुद्दा ठरला…

414
0


मराठवाडा साथी न्यूज

मुंबई :रेणू शर्मा नामक महिलेनं केलेल्या बलात्काराच्या आरोपांमुळं अडचणीत आलेले सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद तूर्तास अबाधित राहणार आहे. लगेचच कुठल्याही निष्कर्षाप्रत येऊन त्यांचा राजीनामा न घेण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतल्याचं सूत्रांकडून समजतं. त्यामुळं मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.धनंजय मुंडे यांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप करत रेणू शर्मा नामक महिलेनं मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या संदर्भातील पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाल्या होत्या. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियातूनच यावर खुलासा केला होता. रेणू शर्मा हिच्याशी आपला काहीएक संबंध नाही. तिची मोठी बहीण करुण शर्मा हिच्याशी परस्पर सहमतीनं मी संबंध ठेवले होते. तिच्यापासून मला दोन मुलं आहेत, अशी कबुलीही मुंडे यांनी दिली होती. मुंडे यांच्या या पोस्टनंतर खळबळ उडाली होती.
रेणू शर्मानं केलेली तक्रार व मुंडे यांच्या खुलाशानंतर विरोधी पक्षांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. दुसऱ्या पत्नीची माहिती प्रतिज्ञापत्रात लपवल्याबद्दल भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्य निवडणूक आयोगाकडं तक्रारही केली. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसवर दबाव वाढला होता. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीही तातडीनं निर्णय घेण्याचे संकेत दिले होते. त्यामुळं मुंडे यांचं मंत्रिपद जाणार अशी चर्चा होती.
मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या रेणू शर्मा हिच्याविरोधात भाजपच्या एका नेत्यानं तक्रार केली. मनसेचे मनीष धुरी यांनी देखील तिच्यावर आरोप केले. त्यामुळं ही महिला ‘ब्लॅकमेलर’ असल्याचं समोर आलं. काल रात्री उशिरा झालेल्या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत हा मुद्दा प्रामुख्यानं चर्चिला गेला. चर्चेअंती मुंडे यांचा राजीनामा घाईघाईनं न घेण्याचा निर्णय झाला, असे सूत्रांकडून समजते. पोलीस चौकशी पूर्ण झाल्यानंतरच पक्षाच्या पातळीवर पुढील निर्णय घेण्याबाबत बैठकीत एकमत झाल्याचं समजतं. या बैठकीला शरद पवार यांच्यासह अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आदी नेते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here