Marathwada Sathi

मुंबई, ठाण्यातील सराईत चोरटे; डोंबिवलीत मोबाईल चोरीत अटक

डोंबिवली: मुंबई, ठाणे परिसरात घरफोड्या, लुटमार करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना रामनगर पोलिसांनी डोंबिवलीतील चार लाखांच्या मोबाईल चोरी प्रकरणात मंगळवारी अटक केली. हे सराईत चोरटे डोंबिवली पूर्व भागातील देसलेपाडा भागात वास्तव्याला होते.या दोन्ही चोरट्यांच्या अटकेने मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरातील अनेक घरफोड्या उघड होण्याची शक्यता रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी व्यक्त केली. फिरोज उर्फ बाटला उर्फ राहुल मुन्ना खान (२५, रा. श्री समर्थ कृपा सर्व्हिस सेंटर, देसलेपाडा, डोंबिवली पूर्व), सागर श्याम पारखे (२३,रा. देसलेपाडा) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

डोंबिवली पूर्वेतील रेल्वे स्थानका जवळील उर्सेकरवाडी मधील प्रिया मोबाईल दुकानाचे मुख्य प्रवेशव्दार तोडून चोरट्यांनी गुरुवारी रात्रीच्या वेळेत चार लाख रुपये किमतीचे मोबाईल चोरुन नेले होते. दुकानातील सीसीटीव्हीमध्ये ही चोरी कैद झाली होती. दुकान मालकाने रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यावर साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समशेर तडवी, साहाय्यक पोलीस निरीक्षक बळवंत भराडे, उपनिरीक्षक केशव हासगुळे, हवालदार सुनील भणगे, सचिन भालेराव, शिवाजी राठोड, हनमंत कोळेकर, विशाल वाघ, तुळशीराम लोखंडे यांची विशेष पथके तयार करण्यात आली. सीसीटीव्ही चित्रण, तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर १२ तासाच्या आत आरोपींना अटक केली.

त्यांच्याकडून चोरीच्या मोबाईल मधील दोन लाख ३७ हजाराचा ऐवज ताब्यात घेण्यात आला आहे. उर्वरित ऐवजाचा तपास सुरू आहे. या दोन्ही आरोपींची पोलिसांनी चौकशी केल्यावर ते मुंबई, ठाणे परिसरातील सराईत गुन्हेगार असल्याचे उघड झाले. अनेक पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. सराईत चोरटे डोंबिवली परिसरातील बेकायदा सर्व्हिस सेंटर, बेकायदा चाळीमध्ये आसरा घेऊन चोरीचे धंदे करत असल्याचे या चोरीतून स्पष्ट झाले आहे.

Exit mobile version