Home धुळे किल्ला पाहण्यासाठी गेलेली महिला कोसळली खोल दरीत!

किल्ला पाहण्यासाठी गेलेली महिला कोसळली खोल दरीत!

जवळपास 60 ते 70 फूट दरीत कोसळून झाला दुर्दैवी मृत्यू

38
0

धुळे : ऐतिहासिक स्थळावर जाण्याच्या मोहाला शक्यतो आवर घालणे प्रत्येकाला कठीणच असते. मात्र उंच, ऐतिहासिक स्थळावर दक्षता घेतच भ्रमंती करणे आत्यावश्यक असते. हिवाळ्याचे दिवस असल्याने फिरण्यासाठी अनेकजण सकाळी कुटुंबासह किल्ल्यावर येतात. धुळे येथील एका ऐतिहासिक स्थळावर मानवी हृदय चिरून ठेवणारी दुर्दैवी घटना घडली आहे. शहरापासून जवळच असलेल्या लळींग किल्ल्यावर मोठी दुर्घटना घडली. कुटुंबासोबत किल्ल्यावर भ्रमंतीसाठी आलेल्या एका महिलेचा पाय घसरून खोल दरीत पडून मृत्यू झाला आहे.
ललिता प्रफुल्ल चव्हाण (वय-38) असं मृत महिलेचं नाव आहे. या प्रकरणी मोहाडी पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शहरातील गोपाळ नगरात राहणाऱ्या ललिता चव्हाण या महिलेचा लळींग किल्ल्याच्या शिखर भागावरून तोल गेल्याने मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी 7.30 वाजेदरम्यान घडली. प्रफुल्ल चव्हाण हे पत्नी, मुलगा यांच्यासोबत सकाळी किल्ल्यावर फिरण्यासाठी गेले होते. यावेळी किल्ल्याच्या शिखरावर असलेल्या मंदिराजवळ अचानकपणे तोल गेल्याने जवळपास 60 ते 70 फूट खोल दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला.
येथे काम करणाऱ्या लोकांच्या सदरील घटना लक्षात येताच त्यांनी गावाचे पोलीस पाटील यांना तात्काळ घटनेची माहिती दिली. स्थानिकांच्या मदतीने सदर महिलेच्या मृतदेहाची शोधाशोध करून तब्बल तीन तासात अथक परिश्रमाने महिलेचा मृतदेह किल्ल्याच्या पाठीमागच्या भागात खाली उतरवण्यात आला. चव्हाण हे देखील त्यापैकीच एक होते. ते सुद्धा आपली पत्नी आणि 12 वर्षीय मुलासोबत फिरण्यासाठी आले होते.
घटनेची माहिती मिळताच प्रफुल्ल चव्हाण यांच्या निकटवर्तीयांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह छिन्न विच्छिन्न अवस्थेत पाहिल्याने निकटवर्तीयांना अश्रू अनावर झाले. किल्ल्याच्या पाठीमागचा भाग अत्यंत घसरडा व निमुळता असल्याने महिलेचा मृतदेह काढणे खूप कठीण जात होते. मात्र लळींग गावातील स्थानिकांसह, इरकॉन टोल कंपनीचे कर्मचारी, मोहाडी उपनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी, वनविभागाचे वनमजुर आदींच्या मदतीने अखेर मृतदेह किल्ल्याच्या मागील भागात खाली उतरून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. मोहाडी पोलीस पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here