Home महाराष्ट्र तामिळनाडू सरकारने शाळा उघडण्याचा निर्णय घेतला मागे

तामिळनाडू सरकारने शाळा उघडण्याचा निर्णय घेतला मागे

1284
0

चेन्नई : तामिळनाडू सरकारने १६ नोव्हेंबरपासून राज्यातील इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा प्रत्यक्ष उघडण्याचा निर्णय घेतला होता. पण पालकांची मते जाणून घेतल्यानंतर सरकारने आपला निर्णय मागे घेतला आहे. तूर्त या शाळा बंदच राहणार असून वर्ग ऑनलाइन सुरू राहतील.
राज्यातील महाविद्यालये देखील १६ नोव्हेंबरपासून उघडणार होती, पण तीही आता बंद असणार आहेत. केवळ रिसर्च स्कॉलर्स आणि विज्ञान-तंत्रज्ञान शाखेतील पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी येत्या २ डिसेंबरपासून महाविद्यालये सुरू होतील, अशी घोषणा सरकारने केली आहे.
सरकारने ९ नोव्हेंबर रोजी राज्यभरातील खासगी, शासकीय आणि अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पालकांची मते जाणून घेतली. मात्र शाळा उघडण्याच्या सरकारच्या निर्णयाविषयी अनेक पालकांनी नाराजी व्यक्त केली. कोरोना व्हायरस महामारी काळात विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायला बरेचसे पालक राजी नव्हते. परिणामी १६ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू करण्याचा निर्णय रद्द करत असल्याचे सरकारने परिपत्रकाद्वारे जाहीर केले. शाळा उघडण्याबाबतचा निर्णय नंतर परिस्थितीनुसार जाहीर करण्यात येईल, असे या परिपत्रकात म्हटले आहे.

मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी १६ नोव्हेंबरपासून शाळा उघडणार असल्याचा निर्णय ३१ ऑक्टोबरला जाहीर केला. विरोधी पक्ष नेते, द्रमुक अध्यक्ष एम. के. स्टालिन यांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला. कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर जानेवारी २०२१ मध्ये शाळा उघडण्याचा निर्णय घ्यावा, असं मत स्टालिन यांनी व्यक्त केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here