Marathwada Sathi

दरोड्याचा तयारीत असलेल्या पुणे-अहमदनगरच्या टोळीच्या जिन्सी पोलिसांनी मुसक्या आवळल्या

औरंगाबाद : शहरात दरोड्याच्या तयारीने कारमधून आलेल्या पुणे-अहमदनगरच्या टोळीला जिन्सी पोलिसांनी गुरूवारी मध्यरात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास पाठलाग करून पकडले. ही कारवाई सावरकर चौक ते आझाद चौक दरम्यान करण्यात आली. यात तीन दरोडेखोर पोलिसांच्या हाती लागले तर दोघे अंधाराचा फायदा घेत पसार झाले. दरोडेखोरांच्या कारमधून पोलिसांनी लोखंडी पाईप, दोरी, मिरची पावडर, एअरगन हस्तगत केली.

सुनील अकुंश मळेकर (२४, रा. दानेप जिल्हापरिषद शाळेजवळ ता. वेल्टा जि पुणे, ह.मु आळंद फाटा, गैवते वस्ती चाकण ता. हवेली जि. पुणे), शेख नशीर शेख बशीर (२६, रा. करंजगाव ता. नेवासा, जि. अहमदनगर), शेख सलीम शेख बाबु (२६, रा. खठकाळी ता. राहुरी जि. अहमदनगर), या तीन दरोडेखोरांना पोलिसांनी पकडले. तिघांची न्यायालयाने रविवारपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली. तर समीर शब्बीर शेख (रा. खटकाळी ता. राहुरी जि. अहमदनगर) आणि साहील शमसोद्दीन सय्यद (रा. पोखरी जि. अहमदनगर) हे दोन दरोडेखोर घटनास्थळावरुन पसार झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिन्सी पोलिसांचे पथक गुरुवारी गस्तीवर असताना मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास एक कार (एमएच १२-ओएफ ५१०४) सावरकर चौक ते आझाद चौक दरम्यान संशयास्पद फिरताना निदर्शनास आली. त्यानंतर गस्तीवर असलेले कर्मचारी नजीर पठाण व पोलीस शिपाई संतोष वाघ यांनी गाडीचा पाठलाग सुरु केला. पोलिसांचे वाहन पाठलाग करत असल्याचे पाहून दरोडेखोरांनी कार उभी करून उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलीस कर्मचारी वाघ यांनी त्यातील शेख नशीर याला पाठलाग करुन ताब्यात घेतले. तसेच पोलीस कर्मचारी नजीर पठाण व काकडे यांनी सुनील मळेकर आणि शेख सलीमला कारमध्ये पकडून ठेवले. याचवेळी अंधाराचा फायदा घेऊन समीर शेख आणि साहिल सय्यद हे दोन दरोडेखोर पसार होण्यात यशस्वी झाले. त्यानंतर जिन्सी ठाण्याचे उपनिरिक्षक दिनेश सुर्यवंशी यांनी पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
दरोडेखोरांच्या कारची झडती घेतली असता त्यामध्ये पोलिसांना एक स्टीलचा मोठा पाईप, लोखंडी रॉड, दोरी, एअर गन, मिर्च पावडर असे दरोडयासाठीचे साहित्य आढळून आले. या दरोडेखोरांविरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दत्ता शेळके करित आहेत.

ही कामगीरी पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, पोलीस उपायुक्त दिपक गि-हे, सहायक पोलीस आयुक्त निशीकांत भुजबळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक व्ही. एम. केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक दिनेश सुर्यवंशी, दत्ता शेळके, सहायक फौजदार नजीर पठाण, हेमंत सुपेकर, संतोष वाघ, काकडे, उस्मान शेख, वाघचौरे, संजय गावंडे, सुनील जाधव, संतोष बमनात यांनी केली आहे.

Exit mobile version