Marathwada Sathi

नांदेड मुंबई स्पेशल एक्स्प्रेस १२ ऑक्टोबर पासून दररोज धावणार

मराठवाडा साथी न्यूज

औरंगाबाद । कोरोना व लॉकडाऊन मुळे गेली ६ महिने बंद असलेली रेल्वे सेवा आता हळूहळू पुर्वपदावर येत आहे. महाराष्ट्र सरकारने मिशन बिगीन अगेन च्या पाचव्या टप्प्यात राज्यांर्तगत रेल्वे सेवेला परवानगी दिल्यानंतर आज मध्य रेल्वेने एक परिपत्रक काढून महाराष्ट्रामध्ये ८ विशेष रेल्वे (१६ फेऱ्या) ११ व १२ ऑक्टोबर पासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

यामध्ये गाडी संख्या ०११४१/०११४२ छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस मुंबई – हुजुर साहेब नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस मुंबई ही रेल्वे ११ ऑक्टोबर पासून दररोज मुंबई येथुन तर १२ ऑक्टोबर पासून दररोज नांदेड येथुन सुटेल. ही गाडी दररोज दुपारी ४:३५ ला मुंबई सीएसएमटी येथुन सुटेल, नंतर मनमाड येथुन रात्री ९:४०, औरंगाबाद येथुन मध्यरात्री ११:४५ ला सुटुन दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजता नांदेड ला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी नांदेड येथुन दररोज सायंकाळी ५ वाजता सुटून, औरंगाबाद येथुन रात्री ९:३५, मनमाड येथुन मध्यरात्री १२:३५ ला सुटुन मुंबई सीएसएमटी येथे सकाळी ५:३५ ला पोहोचेल.

या गाडीला दादर सेंट्रल, ठाणे, कल्याण जंक्शन, इगतपुरी, नाशिक रोड, लासलगाव, मनमाड जंक्शन, नागरसोल, रोटेगाव, लासुर, औरंगाबाद, जालना, परतुर, सेलु, परभणी जंक्शन, पुर्णा जंक्शन या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
ही गाडी पुर्णतः आरक्षित असेल. या गाडीला १७ डब्बे असतील.

Exit mobile version