Home औरंगाबाद मॉर्निंग वॉकला निघालेल्या महिलेचे मंगळसूत्र पहाटे हिसकावले ; रात्री झाला गजाआड ;...

मॉर्निंग वॉकला निघालेल्या महिलेचे मंगळसूत्र पहाटे हिसकावले ; रात्री झाला गजाआड ; सहा महिन्यात सुमारे १५ घटना

2715
0

औरंगाबाद / प्रमोद अडसुळे
शहरात मंगळसूत्र आणि सोनसाखळी हिसकावण्याच्या घटना मोठ्याप्रमाणात वाढल्या आहेत. पोलिसांना खुले आव्हान देत शहरात जानेवारी पासून तब्बल १५ घटना घडल्या आहेत. त्यामुळे महिलावर्गात दहशतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, बुधवारी पहाटे पतीसोबत मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील १० ग्रॅमचे मंगळसूत्र पायी आलेल्या चोराने लांबवले. ही घटना मयूरनगर, एन-११, हडको येथे पहाटे पाचच्या सुमारास घडली. दरम्यान, गुन्हे शाखा पोलिसांनी मंगळसूत्र हिसकावणाऱ्या राजेंद्र उर्फ राजू सुपडा चंडोल (२९, रा. जनुना, ता. जि. बुलढाणा ) याला रात्री उशिरा मजनूहिल भागातून सापळा रचून अटक केले.
नंदा शिवाजी गिरनारे (४०, रा. एन-११,इ-२६, मयुरनगर, हडको) या कुटुंबियांसह किरायाने राहतात. बुधवारी (४ जुलै) पहाटे पाचच्या सुमारास पतीसह घरासमोर फिरण्याकरिता निघाल्या होत्या. त्याचवेळी अचानक अंदाजे २० ते २५ वयोगटातील चोरटा त्यांच्यासमोरून आला आणि त्याने त्यांच्या गळ्यातील ३५ हजार रुपये किंमतीचे १० ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. तेव्हा गिरनारे यांच्या पतीने आरडाओरड करत त्याचा पाठलाग केला मात्र, गल्ल्यांमधून पळून जाण्यात चोरटा यशस्वी झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त दीपक गिर्हे, सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

शहरात मंगळसूत्र चोरांचा धुमाकूळ
यावर्षी शहरात आजपर्यंत सुमारे १५ मंगळसूत्र आणि सोनसाखळी हिसकवल्याच्या घटना घडल्या आहेत.

१ ऑगस्ट
मुकुंदवाडीतील जयभवानीनगरात सकाळी सातच्या सुमारास घडली. शिवानी अरविंद गाढवे (२४, रा. गल्ली क्र. १, मोहटादेवी मंदिर, जयभवानीनगर, मुकुंदवाडी) या सकाळी सातच्या सुमारास पाणी भरण्यासाठी नळावर जात होत्या. त्यावेळी विनाक्रमांकाच्या दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्या एकाने त्यांच्या गळ्यातील नऊ ग्रॅम वजनाचे राजाराणी मंगळसूत्र हिसकावून धुम ठोकली.

३१ जुलै
दुचाकीस्वार चोरांनी फ्रेंडशिप बँड खरेदीचा बहाणा करुन किराणा दुकानातील वृध्देच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोनसाखळी हिसकावून धुम ठोकली होती. ही घटना फ्रेंडशिप डेच्या पूर्वसंध्येला शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास अरिहंतनगरात घडली होती. विशेष म्हणजे वृध्देकडे त्यापुर्वी दोघांनी पाचशे रुपयांचे सुटे देखील मागितले होते. त्यानंतर पुन्हा परत येऊन दोघांनी सोनसाखळी हिसकावली होती.

२० जुलै
आषाढी एकादशीनिमित्त वाळूज परिसरातील पंढरपूर येथील विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या तक्रारदार महिलेचे २५ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना २० जुलै रोजी सकाळी दहा ते साडेदहा वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी चोरट्याविरूध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२४ जून
वटपौर्णिमेनिमित्त घराबाहेर पडलेल्या शिक्षिकेसह दोन गृहिणींचे मंगळसूत्र दुचाकीवर आलेल्या दोन चोरांनी हिसकावून नेले. शहरातील महानुभाव आश्रम, समर्थनगरातील सुंदर लॉज आणि एमआयडीसी वाळुज परिसरातील सिडको महानगरात घटना घडली होती. या घटनेमुळे महिलांमध्ये प्रचंड भिती पसरली आहे.

१३ जून
किराणा सामान आणण्यासाठी निघालेल्या महिलेच्या गळ्यातील ६० हजार रूपये किंमतीचे मंगळसूत्र दोन चोरट्यांनी हिसकावून नेले. चोरट्याविरूध्द सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

१२ जून
अहमदनगर येथे राहणाऱ्या २४ वर्षीय महिलेचे ६६ हजार रूपये किंमतीचे मंगळसूत्र मध्यवर्ती बसस्थानकातून चोरट्याने लांबविले होते. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

५ जून
सिटी चौक भागात बाजारात खरेदीत मग्न असलेल्या महिलेची पिशवी कापून चोरट्यांनी २७ हजार ५०० रूपये किंमतीचे मंगळसूत्र चोरून नेले. याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा आहे.

५ जून
मोफत धान्य वाटप सुरू असल्याचे सांगून दोन भामट्यांनी महिलेच्या गळ्यातील २५ हजारांचे मंगळसूत्र लंपास केले. याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

३० मे
औषधी आणण्यासाठी मेडिकलमध्ये गेलेल्या वृध्देच्या गळ्यातील सोनसाखळी आणि गंठण हिसकावून दुचाकीस्वारांनी धूम ठोकली. ही घटना सिडको महानगरात ३० मे रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास घडली होती.

१४ मे
गर्मी अधिक असल्याने गच्चीवर झोपण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील सात ग्रॅमचे मंगळसूत्र चोराने हिसकावून नेले. ही घटना १४ मे रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास गारखेडा परिसरातील हनुमाननगरात घडली होती. पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

५ एप्रिल
भाजीपाला आणण्यासाठी पायी गेलेल्या वृध्देच्या गळ्यातील अडीच तोळ्यांची सोनसाखळी दोन दुचाकीस्वार चोरांनी हिसकावली. ही घटना ५ एप्रिल रोजी दुपारी अडीचच्या सुमारास बालाजीनगरात एका शाळेजवळ घडली होती.

१९ फेब्रुवारी
शिवजयंतीच्या बंदोबस्तात पोलिस मग्न असल्याची संधी साधुन चोरट्याने शुक्रवारी (दि.१९) दोन जणींचे मंगळसूत्र हिसकावून नेले. या दोन्ही घटना किराणा चावडी आणि टिव्ही सेंटर भागात घडल्या होत्या.

३० जानेवारी
नातेवाईकांकडे हळदी कंकुवाच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्यांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरांनी हिसकावले होते. ही घटना ओंकारेश्वर चौक ते गारखेडा रोडवर सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली होती. विशेष म्हणजे जवाहरनगर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली होती.

७ फेब्रुवारी
धावत्या दुचाकीस्वार महिलेचे दुचाकीवर पाठीमागून आलेल्या दोघांनी ६० हजार रुपये किमतीचे दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण हिसकावले. ही घटना रविवारी दुपारी एकच्या सुमारास कांचनवाडी ते सातारा रस्त्यावरील रिव्हरडेल शाळेजवळ घडली होती.

४ फेब्रुवारी
कारमध्ये आलेल्या भामट्या साधूंनी माजी पोलीस आयुक्तांच्या घराचा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने निवृत्त अधिकाऱ्याच्या गळ्यातील साडेचार तोळ्यांची सोनसाखळी हिसकावली. ही घटना सकाळी साडेआठच्या सुमारास सिडको एन-५ भागातील संत एकनाथ रंगमंदिराकडे जाणाऱ्या सर्व्हिसरोडवर कॉर्नरला घडली होती. यावेळी त्यांना सुमारे दहा फुटापर्यंत कारसोबत फरफटत नेले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here