Home औरंगाबाद आकर्षक व्याजाची भुरळ ; व्यवसायिकाला ८३ लाखांचा गंडा

आकर्षक व्याजाची भुरळ ; व्यवसायिकाला ८३ लाखांचा गंडा

1927
0

चौघांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल

औरंगाबाद : कॉटन यार्न खरेदी-विक्रीच्या व्यवसायिकाला फर्ममध्ये गुंतवणूक केल्यास आकर्षक व्याज व परतावा देण्याचे आमिष दाखवून चौघांनी ८३ लाख ६२ हजारांना गंडविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे बंद पडलेल्या बँक खात्याचे चेक देऊन चौघेही पसार झाले आहेत. हा प्रकार १५ आॅक्टोबर ते १६ नोव्हेंबर २०२० याकाळात घडला. नारायण छगनलाल गाडोदिया, मीना राजेंद्र गाडोदिया, सीमा संतोष गाडोदिया (सर्व रा. खामगाव, जि. बुलढाणा) व विजय रामनिवास गाडोदिया (रा. इंदूर, मध्यप्रदेश) अशी फसवणूक केलेल्या भामट्यांची नावे आहेत.
गंगापुरात सुरेश झुंबरलाल गांधी (५४, रा. अष्टविनायक एन्क्लेव्ह, प्लॉट क्र. ३, रेल्वे स्टेशन रोड) यांची किसान अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज नावाची जाकमाथा वाडी येथे जिनींग प्रेसींग आहे. या जिनींग प्रेसींग संस्थेचे अण्णासाहेब माने व शरद गांधी हे दोघे भागीदार आहेत. त्यांनी ५ जून २००८ रोजी शासकीय, निम शासकीय व इतर सर्व व्यवहार पाहण्यासाठी नोंदणीकृत मुख्त्यारपत्र दिलेले आहे. तेव्हापासून गांधी हेच संस्थेचा व्यवहार पाहतात. तसेच त्यांची आनंद कॉटजिन प्रा. लि. नावाची गंगापुरातील माहुली येथे जिनींग प्रेसींग आहे. या जिनींग प्रेसींग संस्थेचे संचालक गांधीव त्यांचा मुलगा अनुप असे दोघे आहेत. ते इतर कंपन्यांकडून कॉटन यार्न खरेदी करुन त्याची इतर कंपन्यांना गांधी हे विक्री करतात. हा व्यवसाय दलालांमार्फत केला जातो. गांधी यांच्या कंपनीचे ब-याच वर्षांपासून दलाल अर्पित जैन (रा. इंदूर, मध्यप्रदेश) हे खरेदी-विक्रीचे काम पाहतात. दलाल जैन यांनी आॅक्टोबर २०२० च्या पहिल्या आठवडयात गांधींशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांना खामगावात एमसीजी स्पिनर्स नावाची कंपनी असून, कंपनीचे संचालक दोन्ही कंपनीकडे विक्रीसाठी असलेले कॉटन यार्न खरेदी करायला तयार आहेत. ही नामांकित संस्था असून, त्यांचे जिनींग, आॅईल मिल, स्पिनिंग मिल आणि प्रॉपर्टी खरेदी-विक्रीचे उद्योग आहेत. असे सांगितल्यामुळे पहिल्यांदा दलाल जैन यांच्या म्हणण्यानुसार, कंपनीचे व्यवहार पाहणारे संचालक गाडोदिया यांना निरोप पाठविण्यात आला. त्यानंतर कंपनीचे भागीदार नारायण गाडोदिया हे कॉटन यार्नचा व्यवहार ठरवायला आनंद कॉटजिन प्रा. लि. या संस्थेच्या अष्टविनायक एनक्लेव्ह येथे आले. यार्नच्या क्वॉलिटी व गाडोदियाच्या भावाबाबत गांधींनी चर्चा करुन व्यवहार निश्चित केला. त्यानंतर त्यांनी कंपनीचे नारायण, विजय गाडोदिया व त्यांचे नातेवाईक असे भागीदार असल्याचे सांगितले. कॉटन यार्नच्या संपुर्ण बिलाची रक्कम आठ दिवसात कंपनीच्या बँक खात्यात आर.टी.जी.एस. द्वारे जमा करु कंपनीची व्याप्ती खुप मोठी आहे. असे सांगत गाडोदिया कुटुंबियांनी गांधींचा विश्वास संपादन केला. त्यांच्यावर विश्वास ठेऊन गांधी यांनी संस्थांमधील कॉटन यार्न एमसीजी स्पिनर्स या संस्थेला विक्री करण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे १५ आॅक्टोबर ते ३ नोव्हेंबर या काळात बापोडीतील धनलक्ष्मी कॉटन अ‍ॅन्ड राईस मिल प्रा. लि. व आंध्रप्रदेशातील गुंटूर येथील गायत्री कॉटन प्रॉडक्ट या दोन्ही कंपन्यांकडून कॉटन यार्न खरेदी केले. त्यानंतर १५ आॅक्टोबर ते १६ नोव्हेंबर या कालावधीत किसान अ‍ॅग्रो व आनंद कॉटजिन या दोन्ही संस्थेकडून दलाल जैन यांच्या मार्फत १३ क्विंटल कॉटन यार्न एमसीजी स्पिनर्स यांच्या खामगावातील फर्म रिलायबल ट्रेड लिंकला २६ लाख ५६ हजार ७७६ रुपयात विकण्यात आला. या बिलाची रक्कम त्यांनी गाडोदिया याने २३ आॅक्टोबर रोजी आम किसान अँग्रोच्या नावे गंगापुर येथील बँक खात्यात जमा केली. त्यामुळे गांधी यांचा गाडोदियावर आणखीनच विश्वास बसला.
त्यानंतर दोन्ही संस्थेकडून वेळोवेळी एमसीजी स्पिनर्स या कंपनीला पाठविलेल्या कॉटन यार्नच्या मालाच्या एकुण सात बिलांपैकी चार बिलांची रक्कम दोन्ही संस्थेच्या बँक खात्यात जमा झाल्याचे सांगण्यात आले. परंतु उर्वरीत दोन्ही संस्थेची उर्वरीत तीन बिलांची रक्कम ७४ लाख ६५ हजार ८५३ रुपये याबाबत गाडोदिया यांना वेळोवेळी विनंती करण्यात आली. पण त्यांनी सुरुवातीला वेगवेगळी कारणे सांगून वेळ काढूपणा केला. त्यानंतर नारायण गाडोदिया यांनी दोन्ही संस्थेचे ७४ लाख ६५ हजार ८५३ रुपये ताबडतोब देण्यास असमर्थता दर्शवली. तसेच खामगाव व शेगावातील प्रॉपर्टीच्या विक्रीचा व्यवहार झाला आहे. कोरोना लॉकडाऊन असल्यामुळे प्रॉपर्टी विकत घेणारे रजिस्ट्री करायला सध्या येऊ शकत नाही. असे म्हणत प्लॉटची रजिस्ट्री थांबवली असल्याचे म्हणाला.
…….
बंद पडलेल्या बँक खात्याचे चेक……
संस्थेची उर्वरीत मुळ रक्कम ४६ लाख ६८ हजार १८५ रुपये व रकमेच्या ठेवीवर दोन टक्के प्रती महिना याप्रमाणे व्याजासह एकूण रक्कम ५२ लाख २८ हजार ३६७ रुपयांचे दिड महिना मुदतीचे किसान अ‍ॅग्रो इंडस्ट्री या नावाने खामगावातील बँक खात्यात एमसीजी स्पिनर्स या कंपनीचे तीन चेक ३० एप्रिल रोजी वटणारे दिले. आनंद कॉटजिन प्रा. लि. या संस्थेची बाकी असलेली मुळ रक्कम २७ लाख ९७ हजा ६६८ रुपये या रकमेच्या ठेवीवर प्रती महिना दोन टक्के अशी व्याजासह एकुण ३१ लाख ३३ हजार ३९० रुपयांचे दिड महिना मुदतीचे चेक देण्यात आले. मात्र, हे चेक  वटविण्यासाठी बँकेत जमा केल्यावर ते बंद खात्याचे असल्याचे निष्पन्न झाले.
……
आर्थिक गुन्हे शाखेत धाव……
गाडोदिया कुटुंबातील चौघांनी फसवणूक केल्याचे निदर्शनास येताच गांधी यांनी आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार दिली. या तक्रारीवरुन पोलीस निरीक्षक दादाराव शिनगारे, जमादार गोकुळ वाघ, पोलीस नाईक सुनील फेपाळे, नितीश घोडके यांनी पुरावे हस्तगत करुन चौघांविरुध्द गांधी यांच्या तक्रारीवरुन वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा पुढील तपास निरीक्षक शिनगारे हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here