Marathwada Sathi

लसीचा पहिला अधिकार “कोरोना वॉरियर्सचा “- नरेंद्र मोदी

दिल्ली : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोरोना लसीकरणाचा शुभारंभ झाला. यावेळी पंतप्रधानांनी देशवासीयांचं अभिनंदन करत संबोधित केलं. पंतप्रधान म्हणाले,”काही वेळात देशात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू होत आहे. यासाठी मी देशवासीयांचं अभिनंदन करतो. ज्याला सगळ्यात जास्त गरज आहे, त्याला सगळ्यात आधी करोना लस मिळेल,” लसीकरण मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी मोदी म्हणाले,”भारतातील लसीकरण अभियान मानवीय आणि महत्त्वाच्या सिद्धांतावर आधारित आहे. त्यामुळे ज्यांना सर्वाधिक गरज आहे, त्यांना अगोदर लस दिली जाईल.आपले डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी, आरोग्य सेवेतील कर्मचारी यांना अगोदर लस दिली जाईल. या सगळ्यांचा कोरोना लसीवर पहिला हक्क आहे. त्यानंतर अत्यावश्यक सेवा आणि कायदा सुव्यस्थेची जबाबदीर असणाऱ्या लोकांना लस दिली जाईल,” असं मोदी म्हणाले.

“इतिहासात इतक्या व्यापक स्वरूपातील लसीकरण यापूर्वी कधीही झालं नाही. जगात १०० पेक्षा अधिक देश असे आहेत की, ज्यांची लोकसंख्या ३ कोटींपेक्षा कमी आहे. तर दुसरीकडे भारतात लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ३ कोटी लोकांना लस दिली जाणार आहे. मी सगळ्यांना आठवण करून देतो की, करोना लसीचे दोन डोस घेणं अत्यावश्यक आहे. पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये एका महिन्याचं अंतर असेल. दुसरा डोस घेतल्यानंतर २ आठवड्यांनी आपल्या शरीरात करोना प्रतिबंधात्मक शक्ती निर्माण होईल,”अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिली.

Exit mobile version