Marathwada Sathi

खून करुन नदीपात्रात फेकलेला मुकादम अंकुश राठोडचा मृतदेह सापडला

माजलगाव : माजलगाव तालुक्यातील केसापुरी तांडा येथील सरपंचपती अंकुश भाऊराव राठोड (वय 45) हे बेपत्ता असल्याची तक्रार 1 नोव्हेंबर 2020 रोजी माजलगाव ग्रामीण पोलीसात देण्यात आली. पंरतु त्यांचा शोध लागत नव्हता. बुधवारी त्यांची दुचाकी आढळल्यानंतर मारेकर्‍यांनी त्यांचा मृतदेह नदीपात्रातच फेकून दिल्याची कबुली दिली होती. दोन दिवसाच्या शोध मोहिमेनंतर त्यांच्या मृतदेह सापडला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
एक महिन्यापुर्वी अंकुश भाऊराव राठोड हे कोयते बांधण्यासाठी व चालक कामाला आणण्यासाठी दुचाकीवरुन (एमएच-23 के एल 92 74) गेले होते. त्यानंतर ते घरी परतलेच नाहीत. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीसात बेपत्ता असल्याची फिर्यादी देण्यात आली होती. बुधवारी (दि.2) त्यांची दुचाकी सांगवीच्या पुलाखाली गोदावरी नदीत पात्रात सापडल्याने एकच खळबळ उडाली. पुढे पोलीस तपासामध्ये त्यांच्या नात्यातील एकनाथ रामेश्वर चव्हाण, महादेव रूपचंद चव्हाण, सुनिता एकनाथ चव्हाण यांनी त्यांचा खून केल्याची माहिती समोर आली. पोलीसांनी या आरोपींना अटक करताच त्यांनी खुनाची कबुली देत मृतदेह सांगवी येथील गोदावरी नदीपात्रात फेकून दिल्याचे सांगितले. त्यानंतर पोलीसांनी नदीपात्रात शोध मोहिम सुरु केली. सुरुवातील दुचाकी सापडली परंतु राठोड यांचा मृतदेह पोलीसांना सापडत नव्हता. शुक्रवारी (दि.4) संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास नदीपात्रामध्ये कपड्यात गुंडाळलेल्या अवस्थेत राठोड यांचा मृतदेह सापडला. खून कोणत्या हेतुने केला? हे अद्याप स्पष्ट झाले नाही पुढील तपास आष्टी पोलीस करीत आहे.

Exit mobile version