Marathwada Sathi

बच्चू कडूंनी केली घोषणा ; पीडितेला १० लाख रुपयांची मदत

मराठवाडा साठी न्यूज

शिरूर : शिरूर तालुक्यातील न्हावरे येथील ३७ वर्षीय महिलेचा विनयभंग करून तिचे दोन्ही डोळे निकामी करणाऱ्या हल्लेखोरास पोलिसांनी अटक केली आहे. आता या प्रकरणातील महिलेची राज्यमंत्री बच्चू कडू यांनी स्वतः रुग्णालयात जाऊन भेट घेऊन या महिलेला राज्य शासनाच्यावतीने दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

प्राणघातक हल्ला झालेली पीडित महिला ३७ वर्षांची असून पतीसोबत न्हावरे गावात पत्र्याच्या खोलीत वास्तव्यास होती. ३ नोव्हेंबरला रात्री नऊच्या सुमारास घराच्या आजूबाजूलाच शौचालयास गेल्यानंतर बाजूच्या झुडूपात दबा धरून बसलेल्या अज्ञात व्यक्तीने महिलेची छेड काढली. यावेळी महिलेने प्रतिहल्ला केल्यानंतर संतप्त व्यक्तीने महिलेवर हल्ला करत तिचे दोन्ही डोळे निकामी केले.यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाला होता.

जलसंपदा व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना प्रहार जनशक्ती पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पुनमताई तावरे यांनी न्हावरे येथील या महिलेच्या हल्ल्याबाबत माहिती दिल्यानंतर मंत्री बच्चू कडू यांनी तातडीने ससून रुग्णालय येथे जाऊन या महिलेच्या तब्येतीची विचारपूस केली.या भेटीनंतर बोलताना बच्चू कडू म्हणाले की, या महिलेवर झालेल्या हल्ल्याचा मी निषेध करतो. या महिलेला सध्या आधाराची गरज असून महाराष्ट्र शासनाच्या वतीने महिला बालकल्याण विभागाच्या मनोधैर्य योजनेअंतर्गत तातडीने प्रस्ताव पाठवून, दिवाळीच्या आत या महिलेला दहा लाखाची मदत मिळवून देणार आहे.

यापुढील काळात या महिलेला सर्वतोपरी मदत करून आधार देण्याचे काम महाराष्ट्र सरकार व प्रशासन करणार असून, त्यासाठी शासकीय योजनेतून दर महिना एक हजार रुपये मिळून देणार आहे. तर महिला बालकल्याण विभागाचे अधिकारी या महिलेला मिळणारी मदत तिला घरपोच करतील असेही यावेळी बच्चू कडू यांनी सांगितले.

Exit mobile version