Marathwada Sathi

…त्या ग्रामसेवकाचा अखेर मृत्यू…!

मराठवाडा साथी न्यूज

गटविकास अधिकारी यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी

पैठण : बिडकीन ग्रामपंचायत येथे कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी संजय हरिभाऊ शिंदे यांनी पैठणच्या पंचायत समिती मधील गटविकास अधिकारी लोंढे यांच्या त्रासाला कंटाळून मंगळवार(१९ जाने.)सकाळी विषारी औषध प्राशन केले होते. काल पासून त्यांची प्रकृती अचानक खालावली त्यातच गुरुवार(२१ जाने.) रोजी औरंगाबाद येथील सिटीकेअर रुग्णालयात उपचारादरम्यान सकाळी दहा वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. यामुळे संबंधित गटविकास अधिकारी यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.

पैठण तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांना दरमहा पैशांची मागणी करीत असलेले पैठण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व्ही. डी. लोंढे हे ग्रामसेवकांना दरमहा मिळत असलेल्या पगारातून व वित्त आयोगातील काढण्यात आलेल्या धनादेशातून पैशांची मागणी करतात. तसेच पैशांची मागणी पूर्ण न करणाऱ्या ग्रामसेवक कार्यरत असलेल्या ग्रामपंचायत मधून अभिलेख स्वतः लोंढे जमा करून घेतात व ग्रामसेवकाना पैशांची मागणी करून मानसिक त्रास देतात, असा आरोप त्यांच्यावर ग्रामसेवक युनियनच्या सदस्यांनी केला आहे. सर्व ग्रामसेवक युनियनच्या सदस्यांनी निवेदनातलेखी दिले आहे. सदर गटविकास अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई न झाल्यास आज(२१ जाने.)गुरूवारपासून ग्रामसेवकाचे संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे कामकाज बंद केले जाईल, असं युनियनने सांगितलं आहे. आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या गटविकास अधिकारी लोंढे यांची सीआयडीमार्फत चौकशीही करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या सर्व सदस्यांनी जिप मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनात केली आहे.

यापूर्वीसुद्धा सदर गटविकास अधिकारी लोंढे हे वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर पंचायत समितीमध्ये कार्यरत असताना अनेक ग्रामसेवकांना त्रास दिलेला असून तिथेही ग्रामसेवक बुद्धदेव म्हस्के यांनी लोंढे यांच्या अशाच त्रासामुळे आत्महत्या केली त्याचीही चौकशी सध्या सुरू आहे, आता औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण पंचायत समिती मध्ये कार्यरत असलेले गटविकास अधिकारी लोंढेमुळे दुसऱ्या ग्रामविकास अधिकारी बिडकीन ग्रामपंचायत मध्ये असलेले संजय हरिभाऊ शिंदे यांनी आत्महत्या केली आहे. ग्रामसेवक शिंदे यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या गटविकास अधिकारी यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला असून उस्मानपुरा पोलिसांनी परिस्थिती नितयंत्रणात आणण्याचे प्रयत्न करत आहेत.

Exit mobile version