Marathwada Sathi

बाळासाहेबांबद्दल भरभरून बोलल्या..!

मराठवाडा साथी न्यूज
मुंबई:
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मानवंदना देण्यासाठी दादर येथील त्यांच्या स्मृतिस्थळावर शिवसैनिक व नेत्यांची रीघ लागली आहे. अलीकडेच शिवसेनेत प्रवेश केलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनीही शिवतीर्थावर जाऊन बाळासाहेबांना अभिवादन केलं. उर्मिला यांनी यावेळी बाळासाहेबांबद्दलच्या अनेक आठवणी जागवल्या. ‘प्रत्येक मराठी माणसाच्या मनात बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी जे आदराचं स्थान आहे, तेच स्थान माझ्याही मनात आहे. २५ ते ३० वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीत वावरत होते. माझ्यासोबत अनेक मराठी मंडळी होती. बाळासाहेब ‘मातोश्री’मध्ये असल्यामुळं आम्हाला तिथं कायम सुरक्षित वाटत आलं. आमच्यासाठी अजूनही ते इथेच आहेत,’ अशा भावना उर्मिला यांनी व्यक्त केल्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचंही त्यांनी भरभरून कौतुक केलं. ‘राजकारणातील सध्याच्या अत्यंत वाचाळ अशा वातावरणात उद्धव ठाकरे हे कृतीतून बोलणारं व्यक्तिमत्त्व आहे. कृतीवर त्यांचा विश्वास असतो. त्यामुळं ते आपोआपच लोकांपर्यंत पोहोचतात. ‘बोले तैसा चाले…’ असं त्यांचं वागणं आहे. मुख्यमंत्री म्हणून ते फक्त लोकांना सूचना देत नाहीत तर स्वत:ही त्यांचं पालन करतात. दसरा मेळाव्यासारख्या मोठा कार्यक्रम त्यांनी ज्या संयमानं व नियमपालन करून पार पाडला, ते कौतुकास्पद होतं,’ असं त्या म्हणाल्या.’करोनाच्या काळात मंदिरं उघडण्यासाठी विरोधी पक्ष सातत्यानं आरडाओरडा करत असतानाही उद्धव ठाकरे यांनी संयमानं निर्णय घेतला. केवळं मंदिरं हाच आपला धर्म नाही आणि सत्ता अंतिम नाही. लोकांची आयुष्यं अधिक महत्त्वाची आहेत, ही भूमिका त्यांनी घेतली. त्यांच्या या भूमिकेमुळंच आज करोना आटोक्यात आलेला आपल्याला दिसतो,’ असं उर्मिला यांनी म्हंटल आहे .

Exit mobile version