Home होम स्टँडअप कॉमेडियन फारुकीला जामीन नाहीच….!

स्टँडअप कॉमेडियन फारुकीला जामीन नाहीच….!

363
0

मराठवाडा साथी न्यूज
इंदूर:
हिंदू देवी-देवतांवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी हायकोर्टाने स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीचा जामीन अर्ज फेटाळला. या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली. देशात सौहार्दपूर्ण वातावरण ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे, असे मत कोर्टाने नोंदवले. फारूकीच्या जामीन अर्जावर २५ जानेवारीला सुनावणी झाली होती. मात्र, कोर्टाने त्यावरील निर्णय राखून ठेवला होता. गुरुवारी कोर्टाने निर्णय देत, याचिका फेटाळून लावली.
२५ जानेवारीला कोर्टात झालेल्या सुनावणीवेळी अॅड. विवेक तन्खा यांनी मुनव्वर फारुकीची बाजू मांडली होती. कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. सर्व धर्मांचा आदर करतो, असे फारुकीने म्हटले होते. पोलीस तपास आणि सुनावणी यात खूप वेळ जाईल. त्यामुळे जामीन देण्यात यावा, अशी विनंतीही त्याने केली होती.या प्रकरणात कोर्टात सरकारनेही बाजू मांडली होती. फारूकीविरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अन्य राज्यांतही गुन्हे दाखल आहेत. फारूकीच्या कृतीने सर्वसामान्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत आणि त्यामुळे त्याला जामीन दिला जाऊ नये, असे सरकारी पक्षाने म्हटले होते.
हिंदू देवी-देवता आणि भगवान राम-सीता, तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपाखाली मुनव्वर फारुकीला इंदूर पोलिसांनी १ जानेवारीला अटक केली होती. कॉमेडी शोमध्ये आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याचा आरोप त्याच्यावर आहेत. या प्रकरणी भाजप आमदार मालिनी लक्ष्मणसिंह गौड यांचा मुलगा एकलव्य सिंह गौड यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here