Marathwada Sathi

नरभक्षक बिबटयाच्या शोधार्थ विशेष नेमबाजांचे पथक

मराठवाडा साथी न्यूज

पाथर्डी : तालुक्यातील नरभक्षक बिबटयाच्या शोध मोहिमेअंतर्गत राज्याच्या मोहिमेतील अनुभवी व विशेष कौशल्य नेमबजांना पाचारण करण्यात आले आहे. वनविभागाच्या जिल्हास्तरीय मोहिमेचे केंद्र पाथर्डी झाले असून जिल्हा उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी तालुक्यात तळ ठोकुन शोधमोहिम यंत्रणेचे संचालन करीत गेल्या पंधरा दिवसात तालुक्यात तीन बालकांना बिबटयाने पालकासमक्ष उचलून नेउन बळी घेतला. या प्रकारामुळे परिसरात दहशत पसरली आहे. अफवांनाही तेवढाच पेव फुटला आहे. शनिवारी दि.३१ विशेष तज्ञांचे चार पथके नव्याने दाखल झाले आहे.
जुन्नर, संगमनेर, धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, बीड येथील पथके दाखल होताच त्यांनी तत्काळ शोध मोहिमेला सुरवात केली. उपवनसंरक्षक रेड्डी यांनी विशेष पथकासमवेत संपुर्ण कार्यक्षेत्रात कर्मचारी व अधिकारी साधन सामुग्रीसह तात्काळ रवाना झाले.
सर्च लाईट,नाईट मोड कॅमेरे, खोल दरित उतरण्यासाठी अत्याधुनिक ट्युब संच, बेशुद्ध करण्यासाठीच्या बंदुका व औषधे रेस्क्यु व्हॅन्स, अंगावर फेकण्यासाठीचे जाळे,लाठया काठ्या, मानेभोवतीचे सेफ्टी बेल्टी,वॉकी टॉकी सेट आशा सर्व प्रकारच्या अत्याधुनिक साधनसामुग्रीसह शहरातील हंडाळवाडी पासुन वृद्धेश्वर घाट परिसर व गर्भगिरी डोंगर रांगाचा निर्जन प्रदेश या भागामध्ये सर्व कर्मचारी व अधिकारी विखुरले गेले आहेत. आतापर्यंत बिबटयाने तीनही हल्ले रात्री केले असल्याने निशाचर बिबटया समजुन शोध मोहीमेची आखणी करण्यात आली आहे.आशा मोहिमेमध्ये यशस्वी ठरलेल्या सर्वच अधिकाऱ्यांन ऑपरेशन पाथर्डीसाठी पाचारण करण्यात आले आहे.तालुक्यात ठिकठिकाणी सध्या १८ पिंजरे लावले असून आवश्यकतेनुसार पिंजऱ्याची संख्या वाढविण्यासाठी इतर जिल्ह्यातुन पिंजरे मागविण्यात आले आहेत.बिबटयाचे माग शोधणारी विशेष यंत्रणा यंदा प्रथमच वापरण्यात येत आहे.
शोध मोहिमेतील कर्मचाऱ्यांचे वैशिष्टये असे की बहुतेक कर्मचारी कमी वयोगटातील व अत्यंत तंदुरुस्त आहेत.या मोहिमेत परिसरातील भटक्या जमातीतील लोकांना सामावुन घेण्यात आले आहे. वास, पावलांचे ठसे,अन्यप्राणी व पक्षांच्या हालचाली,पक्षांचे विशिष्ट आवाज याचाही उपयोग केला जात आहे येथील येथील वनपरिक्षेत्र अधिकारी सतिश शिरसाट यांचे पथकातील कर्मचारी मायंंबा परिसरातील माथ्याापासुन पायथ्यापर्यंत विशेष साधन सामुग्रीसह शोधमोहिम सुरू करणार आहेत. ही घटना सरकारने अत्यंत गांभीर्याने घेतली असुन नरभक्षक बिबट्या दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेशासाठी वस्तुस्थितीची गोपनीय पथकाकडून माहिती संकलित केली जात आहे. दरम्यान पाथर्डी वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मद्यप्राशानाच्या तक्रारीबाबत माहिती देतांना रेेड्डी म्हणाले, सध्या बिबट्याच्या शोधासाठी प्राधान्य असुन त्यानंतर दोषी कर्मचाऱ्यांबाबत सखोल चौकशी करून कारवाई केली जाईल.
पहाटे भगवानगडाच्या पायथ्याशी बिबट्या दिसला
पाथर्डी तालुक्यातील भगवानगड पायथ्याशी पाण्याच्या टाकीजवळ पहाटे बिबट्या आढळुन आल्याची माहिती घोगस पारगाव येथील नागरीकांनी दिली आहे भगवानगड परिसरातील नागरीकांनी दक्षता घ्यावी लहान मुलांना घराबाहेर जाऊ देऊ नये.

Exit mobile version