Marathwada Sathi

सोळा जुगार्‍यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

बीड : परळी, अंबाजोगाई तालुक्यातील पत्त्याच्या दोन क्लबवर अंबाजोगाईचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील जायभाये यांच्या विशेष पथकाने धाड टाकून तब्बल ७ लाख १८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत १६ जुगार्‍यांना गजाआड केले. ही कारवाई काल रात्री करण्यात आली.
परळी शिवारातील एका विटभट्टीच्या बाजुला असलेल्या ओढ्याच्या मोकळ्या प्रांगणात काही जुगारी झन्नामन्ना जुगार खेळत असल्याची माहिती डीवायएसपींच्या पथकाला मिळताच त्या ठिकाणी काल सायंकाळी ६ वाजता पथकाने धाड टाकली असता तिथे काही जुगारी ताब्यात घेतले. यामध्ये एका अल्पवयीन जुगार्‍याचाही समावेश आहे. या वेळी जुगार्‍यांकडून दुचाकी, मोबाईल, दारू व रोख रक्कम असा एकूण ७ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


या प्रकरणी पो.ना. पुरुषोत्तम मिसाळ यांच्या फिर्यादीवरून जुगार्‍यांवर परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी कारवाई अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे करण्यात आली. येथे काही जुगारी तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती पथकाला मिळताच त्या ठिकाणी पथकाने धाड टाकली असता काही जुगार्‍यांना ताब्यात घेतले. या वेळी एक जुगारी पळून गेला.


त्या कारवाईत मोबाईल, रोख रक्कम असा एकूण ४० हजार १० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पो.ह. संजय गुंड यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखलकरण्यात आला आहे. सदरील कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार शफी, पो.ह.संजय गुंड, पो.ना. बिक्कड, पो.कॉ. राजकुमार मुंडे, अशोक खेलगुडे, सतीश कांगणे, आतकरे यांनी केली.

Exit mobile version