Marathwada Sathi

जळगाव जिल्ह्यात “त्या” पहिल्या तृतीयपंथी विजयी

जळगाव जिल्ह्यातील पहिल्या तृतीयपंथी अंजली पाटील भादली ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विजयी उमेदवार ठरल्या आहेत.

जळगाव :जळगाव जिल्ह्यातील पहिल्या तृतीयपंथी अंजली पाटील भादली ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विजयी उमेदवार ठरल्या आहेत. जभादली बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अंजली यांनी वॉर्ड क्रमांक चारमधून सर्वसाधारण महिला प्रवर्गातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेऊन तो बाद केला होता. तृतीयपंथी असल्याने त्यांना महिला प्रवर्गातून उमेदवारी करता येणार नाही, मतदार यादीतही त्यांच्या नावापुढे लिंगाचा उल्लेख ‘इतर’ असा असल्याने त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. मात्र, अंजली यांनी हार मानली नाही. त्यांनी आपली सहकारी तृतीयपंथी शमिभा पाटील यांच्या मदतीने न्यायासाठी थेट उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे दार ठोठावले. या ठिकाणी कायदेशीर बाजू मांडल्याने त्यांना न्याय मिळाला. न्यायालयाने त्यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दिला. म्हणून शेवटी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना त्यांची उमेदवारी मान्य करावी लागली. गावाचा विकास हाच त्यांचा ध्यास असेल असं त्यांनी या विजयानंतर सांगितलं.

विजयानंतर वंचित बहुजन आघाडीच्या शमिभा पाटील यांनी म्हटलं आहे की, “अंजली पाटील या बहुमताने विजयी झाल्या आहेत. हा वंचित बहुजन आघाडीचा आणि वंचित घटकांचा विजय आहे. या लढाईत ज्यांनी ताकत आणि बळ दिलं त्या सर्वांचे आभार” असं शमिभा पाटील यांनी विजयानंतर म्हटलं आहे.

Exit mobile version